गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाकुर्ली अशा ठाणे-दिव्याच्या पलीकडे असलेल्या रेल्वे मार्गावर अपघातांची संख्या कमालीची वाढली आहे. या भागातील लोकसंख्येचा आलेख दिवसागणिक वाढत असताना प्रवाशांना अतिरक्त सेवासुविधा कुठे मिळत आहेत याचाही विचार करण्याची आता गरज आहे. लोकसंख्या वाढते आहे पण कचराभूमी नाही या मुद्दय़ावर कल्याण-डोंबिवलीतील बांधकामे थांबली आहेत. हाच निकष रेल्वे आणि इतर परिवहन सेवांविषयी लावायचा ठरविल्यास कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर त्यापलीकडे नागरीकरणाच्या वारूवर स्वार झालेल्या इतर शहरांमध्येही बांधकामे बंद करावी लागतील.
डोंबिवलीकर भावेश नकातेचा लोकल प्रवासात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे लोकलमधील गर्दी आणि त्यामुळे होणारे मृत्यू हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. लोकलमधील गर्दीमुळे चढायला न मिळाल्यामुळे, रेल्वे रुळ ओलांडताना दररोज लोकल, लांब पल्ल्यांच्या अपघातांचे बळी ठरत आहेत. तब्बल तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचा विचार केला तर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर परिसर आटोपशीर लोकसंख्येचा होता. नागरीकरणाची चाहूल या भागात दिसत नव्हती. तरी या भागातील रेल्वे फलाटांवर थोडीफार धक्काबुक्की करीत, काहीसा मोकळा श्वास घेत प्रवासी लोकलमध्ये चढत होते. हे चित्र ज्यांनी अनुभवले आहे त्यांना कल्याण-डोंबिवली या शहरांना लोकलमधील गर्दी पाचवीला पुजली असल्याचा अनुभव नवा नाही. त्यावेळीही अपघात होत होते. असे असले तरी अलीकडच्या काळात ज्या प्रमाणात लोकल अपघातांची संख्या वाढत आहे ते पाहता लोकल प्रवास म्हणजे मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे.
१९७० ते १९७५ पासून विविध प्रांतांमधील रहिवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कल्याण परिसरात राहण्यास येऊ लागले. त्यांचा मुंबईकडील प्रवास वाढला. त्यानंतरच्या पाच वर्षांत मुंबईतील गिरण्या बंद पडत गेल्या. हा कामगार वर्ग हळूहळू आपल्या अस्तित्वासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणच्या दिशेने सरकला. परंतु त्याचे रोजीरोटीचे साधन त्याने मुंबईच ठेवले. वाढत्या लोकवस्तीमुळे घरांची गरज वाढली. त्यातून नागरीकरणाने वेग घेतला. नागरीकरणाच्या वेढय़ात कल्याण परिसरातील शहरे कधी लुप्त झाली, हे कोणाला कळलेच नाही. आतातर जुने-नवे कल्याण, डोंबिवली, ग्रामीण डोंबिवली, विस्तारित उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ असे शहरांचे तुकडे पडले आहेत. या शहरांमधील एकजीनसीपणा कधील लुप्त झाला आहे.
तर अपघात कमी होतील
ठाण्याहून वाशी, पनवेल लोकल सेवा सुरू झाल्यापासून ठाणे स्थानक सीएसटीनंतर गर्दीचे सर्वाधिक ठिकाण बनले आहे. या गर्दीचे विभाजन करणे रेल्वे प्रशासनाच्या हातात आहे. परंतु रेल्वेतील बाबूशाही अपघाताच्या मोठय़ा घटना घडल्याशिवाय काही करायचेच नाही, अशा पद्धतीने काम करत आहे. रेल्वेमंत्री, रेल्वेचे दिल्लीचे वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश आला की, स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रवासी संघटनांच्या बैठका घेतल्या जातात. सूचना मागविल्या जातात. पण प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनांची दखल घेण्याऐवजी हे बाबू अधिकारी आपल्या मनाला पटेल असेच प्रस्ताव तयार करतात. पदाधिकारी काही म्हणोत, समितीने काही निष्कर्ष काढोत. संघटनेने मांडलेल्या मताला काडीचीही किंमत रेल्वेचे बाबू लोक देत नाहीत. म्हणून वाढते लोकल अपघात होऊन त्यावर उपाययोजना करण्यात तंत्रज्ञानात आघाडी घेत असलेली रेल्वे सेवा मागे पडते. सकाळच्या वेळेत कर्जत, कसाऱ्याहून ठाण्यापर्यंत शटल सेवा सुरू केली तर, या भागातून येणाऱ्या अतिजलद लोकलवरील भार कमी होईल. तसेच, संध्याकाळच्या वेळेत ठाण्याहून कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने लोकल सोडण्यात याव्यात. या सेवेमुळे नवी मुंबई भागातून सकाळ ते संध्याकाळ जो तीन ते चार लाखांचा लोंढा ठाणे रेल्वे स्थानकात आदळतो. त्या गर्दीचे विभाजन होईल. तसेच, ‘सीएसटी’कडून येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी ठाण्यात झुंबड उडणार नाही. पंधरा वर्षांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकात इनमिन दोन ते तीन प्रवासी उतरायचे किंवा चढायचे. आता त्याच दिवा रेल्वे स्थानकात सकाळ, संध्याकाळ डोंबिवली रेल्वे स्थानकाएवढीच गर्दी असते. सकाळी, संध्याकाळी दिवा रेल्वे स्थानकात ज्या पद्धतीने लोकल प्रवाशांनी भरतात, ते पाहता या गर्दीचा रेल्वे प्रशासनाने विचारच केलेला नाही. हा वाढता प्रवासी अपघाताचे मोठे कारण आहे.
कर्जत, कसाऱ्यासह, कल्याणहून सकाळच्या वेळेत लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवाशांना मुंबईच्या दिशेने वाढीव दर आकारून रेल्वेने प्रवासाला मुभा दिली तर प्रवासी वाढीव दर मोजण्यास तयार होतील. हा प्रवासी लोकलची वाट न पाहता मुंबईत येईल. अशीच सुविधा सीएसटी, कुर्ला येथील लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये उपलब्ध करून दिली तर, ठाणे, कल्याण, कर्जत, कसाऱ्याचा बहुतांशी प्रवासी या गाडय़ांनी लोकलची वाट न पाहता पुढे निघून जाईल. दिवा-वसई रेल्वे मार्ग उपनगरी रेल्वे सेवेचे (सबर्बन सेक्शन) केंद्र म्हणून रेल्वे प्रशासानाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केला आहे. हा रेल्वे मार्ग माल वाहतुकीसाठी निश्चित आहे. या रेल्वे मार्गावर दर्शक यंत्रणा, स्थानकांचे आधुनिकीकरण करून दिवा-वसई, पनवेल ते विरार-डहाणू शटल, लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी प्रवाशांची जुनी मागणी आहे. असे झाले तर वसई, विरार, डहाणू भागातील प्रवासी दादर, ठाणे भागात न येता पनवेल ते विरार, डहाणू लोकलने पुढचा प्रवास करील. दोन र्वष उलटूनही रेल्वे अधिकारी उपनगरी सेवेचे हे केंद्र सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीत. कळव्याजवळ तुर्भे भागात जाणारा मध्य रेल्वेचा रेल्वे मार्ग (लूप लाइन) आहे. या एकेरी मार्गावरून रात्रीच्या वेळेत मालगाडय़ांची ये-जा सुरू असते. ज्या मार्गावरून मालगाडय़ा ये-जा करतात. त्या रेल्वे मार्गावरून सकाळ-संध्याकाळच्या वेळेत दोन ते तीन या प्रमाणात लोकल सोडल्या तरी वीस ते तीस हजार प्रवाशांचा ये-जा करण्याचा मार्ग मोकळा होतो. कल्याण ते वाशी (कळवामार्गे) अशी लोकल सेवा प्रस्तावित आहे. या मार्गावर दर्शक व इतर काही तांत्रिक अडचणी असतील तर रेल्वेने त्या सोडविल्या पाहिजेत. या पर्यायी रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर येणारा प्रवाशांचा भार कित्येक प्रमाणात कमी होऊ शकतो. अडगळीत पडलेल्या पर्यायी मार्गाचा रेल्वे प्रशासनाने विचार केला तर, सुखकर प्रवासासाठी डब्यातील बाकडे काढा, असे उद्योग करण्याची रेल्वेला गरजच भासणार नाही. डब्यातील बाकडे कमी करण्याचा उद्योग यापूर्वी करण्यात आला होता, पण तो फसला. हे रेल्वे प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे.
आताच अपघात का वाढले?
कर्जत, कसारा, खोपोली, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, ठाणे परिसरातून दररोज सुमारे तीन ते चार लाख प्रवासी शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त नवी मुंबई परिसरात दररोज ये-जा करतात. हा प्रवासी यापूर्वी ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली येथून बसने, लोकलने कुर्ला येथून नवी मुंबईत प्रवास करीत होता. आठ ते दहा वर्षांपूर्वी ठाणे ते वाशी (नवी मुंबई), पनवेल लोकल सेवा (ट्रान्स हार्बर) सुरू झाली. लोकलने कुर्ला येथून वळण घेऊन, डोंबिवली, ठाण्याहून बसने लोंबकळत नवी मुंबईच्या दिशेने एक ते दीड तास प्रवास करण्यापेक्षा प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासात वाशी, नवी मुंबई परिसरात जाण्याची सुविधा उपलब्ध झाली. कल्याण, डोंबिवलीचा प्रवासी जलद लोकलने ठाण्याला आठ मिनिटांत पोहोचतो. हाच प्रवासी ठाण्याला वाशीची लोकल पकडून पुढचा प्रवास अर्धा तासात पूर्ण करतो. कर्जत, कसारा, खोपोलीकडून येणारा प्रवासी लोकलने कुल्र्याला जाण्यापेक्षा ठाण्याला उतरणे पसंत करतो. कमी वेळात लांबच्या ठिकाणी पोहोचण्याची स्पर्धा जशी रस्ते वाहतुकीत आहे, तशीच स्पर्धा लोकल प्रवासाच्या माध्यमातून प्रवासी करीत आहेत.
कर्जत, कसाऱ्याकडून येणाऱ्या ज्या प्रवाशांना वाशीला जाण्यासाठी ठाण्याला उतरायचे असते, ते सर्व प्रवासी टिटवाळा, उल्हासनगर रेल्वे स्थानकात येत आहेत. याच वेळी ठाणे रेल्वे स्थानकात उतरण्यासाठी प्रवासी लोकल दरवाजाच्या तोंडावर येऊन रेटारेटी करीत उभे राहतात. मग कल्याण, डोंबिवलीचा कमी वेळेत प्रवास करण्याचे गणित बांधत कोणत्याही परिस्थितीत अतिजलद लोकल पकडेन, असा निर्धार करून या लोकलमध्येच शिरतात. ठाण्याला उतरण्यासाठी चिंतेत असलेले लांबच्या प्रवासाचे प्रवासी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानके येताच अक्षरश: डोळे मिटून घेतात. या स्थानकात माणूस नावाचा प्राणी चढतो की किडी, मुंगी शिरत आहेत याचा अजिबात विचार हा आतला प्रवासी करीत नाही. आतल्या गुदमरलेपणामुळे त्याला तशी गरजही वाटत नाही. कारण त्याला चिंता असते, ठाणे रेल्वे स्थानकात उतरण्याची.