कल्याण – खासगी रुग्णालयात सुरू असलेला वडिलांवरील आजाराचा खर्च परवडत नाही. हातात उपचारासाठी पैसै नाहीत. उपचाराचा हा खर्च भागविण्यासाठी मुरबाडमधील एका तरुणाने डोंबिवलीत एका घरातून पाच लाख ९२ हजार रुपयांची चोरी केली होती. विष्णुनगर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून चोरट्याला मुरबाड येथून अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैभव मुरबाडे असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याजवळील चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. वैभवचे वडील आजारी असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दररोजचा वैद्यकीय खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे जवळ नसल्याने हा खर्च भागविण्यासाठी त्याने चोरी करून या रकमेची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. परंतु, चोरी केल्यानंतर तो प्रकार त्याच्या अंगलट आला.

हेही वाचा – ठाण्याच्या तुलनेत रायगड आणि पालघरमधील महिलांचे आरोग्य चिंताजनक

हेही वाचा – “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळताच ठाण्यातल्या शाखा…” राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर आरोप

डोंबिवली पश्चिमेतील एका घरात गेल्या आठवड्यात चोरी झाली होती. याप्रकरणी घर मालकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रारदाराच्या घर परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून तपास सुरू केला होता. या तपासात एक तरुण चोरी करून तेथून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. या चित्रिकरणातील तरुणाची ओळख पोलिसांनी पटवली. चोरटा तरुण मुरबाड तालुक्यातील असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या तरुणाचे मुरबाडजवळील गाव शोधून त्याच्यावर पाळत ठेवली. त्याला सापळा लावून अटक केली. वडिलांच्या आजाराचा खर्च भागविण्यासाठी आपण ही चोरी केल्याची कबुली वैभवने पोलिसांना दिली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. ए. भवार, अमोल आंधळे यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son robbed house in dombivli to pay for father illness ssb