सदर्न बर्डविंग किंवा कॉमन बर्डविंग नावाने ओळखले जाणारे फुलपाखरू हे भारतातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू आहे. याचा आकार सुमारे १२०-१९० मि.मी. एवढा असतो. हे स्व्ॉलोटेल कुळामधील फुलपाखरू असले तरी याच्या शेपटीला इतर फुलपाखरांसारखे टोक मात्र नसते.
या फुलपाखराचे पुढचे आणि मागचे दोन्ही पंख हे काळ्या रंगाचे असतात. त्याच्या पुढच्या पंखांच्या वरच्या बाजूस वाहिन्यांच्या वर पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. तर मागच्या पंखांवर याच वाहिन्यांच्या वर पिवळ्या रेषा आणि काही पिवळे ठिपके यांची सुरेख गुंफण असते. मागील पंखांच्या खालच्या बाजूस पिवळे ठळक धब्बे असतात. हे कुठूनही अगदी सहज पाहता येतात आणि विशेषत: हे फुलपाखरू फुलावर पंख मिटून बसले की हे पिवळे धब्बे जास्त उठून दिसतात. मुळामध्ये ते उठून दिसावे म्हणूनच जास्त ठळक असतात. अर्थात ही सूचना असते खास करून भक्षकांसाठी ‘माझ्या वाटेला जाऊ नका, माझ्या शरीरात विष आहे,’ असा त्याचा सरळसरळ अर्थ असतो. या फुलपाखराची मादी ‘अरिस्टोलोकी असी’ कुळामधील झाडांवर पानांच्या खालील बाजूस अंडी घालते. बाहेर येणारे सुरवंट हे या झाडांची पाने खाऊन वाढतात.
या पानांमध्ये अरिस्टोलोकीक अ‍ॅसिड नावाचे विषारी रसायन असते. हे रसायन सुरवंटांच्या शरीरात साठते आणि हे फुलपाखरू विषारी बनते.
या फुलपाखराचे सुरवंट हे गडद लाल रंगाचे असतात. तर त्यांचे डोके चमकदार काळ्या रंगाचे असते. यांच्या अंगामध्ये एवढे विषारी द्रव्य असूनही एक प्रकारच्या गांधील माश्यांच्या अळ्या या सुरवंटांवर जगतात आणि वाढतात. सदर्न बर्डविंग फुलपाखराच्या सुरवंटाची वाढ पूर्ण झाली की ते कोशामध्ये जातात. हा कोश तपकिरी किंवा हिरव्या रंगाचा असतो आणि त्यांच्यावर गडद तपकिरी रंगाच्या रेषाही असतात. या कोशाला जर कोणी स्पर्श केला तर तो कोश आकुंचन पावतो. शिवाय काही वेळा धोका जाणवला तर कोशामधील सुरवंट आवाजही काढतो. हा आवाज फारसा मोठा नसतो. मात्र तो तीव्र असतो. हा आवाज सुरवंट कसा काय काढतो यावर मात्र शास्त्रज्ञांची मतांतरे आहेत.
सदर्न बर्डविंग फुलपाखरू विशेष करून पावसाळा आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे अगदी केरळपर्यंत आणि काही वेळा श्रीलंकेतही पाहायला मिळते.
याला कुठल्याच प्रकारच्या वातावरणाचे वावडे नसते. त्यामुळे अगदी समुद्रसपाटी, माळराने, डोंगरामाथे, दाट रान अशा सर्व ठिकाणी हे फुलपाखरू आढळते.

उदय कोतवाल