ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील राजे शहाजी भोसले आणि आजोबा मालोजीराजे भोसले यांची स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षीत आहे. राज्य शासन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर पुरुषांच्या समाधीस्थळी स्मारक बांधून परिसराचा विकास करावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राव्दारे केली आहे.
आमदार रईस शेख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले, त्यांचे वडील शहाजी राजे भाेसले (इ. स. १५९४-१६६४) यांना इतिहासात ‘स्वराज्य संकल्पक’ म्हटले जाते. दक्षिणेत अत्यंत पराक्रम गाजवलेल्या शहाजी भोसले यांचे शिकारी दरम्यान घोड्यावरुन पडून अपघाती निधन झाले. त्यांची समाधी कर्नाटकातील ‘होदगिरे’ येथे आहे. सदर समाधी स्थळाचा जिर्णोद्धार करण्याची महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक सरकारांनी घोषणा केली, प्रत्यक्षात समाधी उपेक्षीत आहे. बेळगाव सीमाभागातील मराठी -कन्नड वादाचा समाधीस्थळाच्या विकासाला फटका बसला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले (इ. स. १५५२-१६०५) यांची समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिर परिसरात आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य असून येथे साधा फलकही नाही. मालोजी भोसले यांनी तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांच्या साथीने आदिलशाही विरोधातील लढ्यात मोठा पराक्रम केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे-सुपे जहागिरीतून स्वराज्याचे रणशिंग फुंकले, ती जहागीर मालोजी भोसले यांना मिळालेली होती. मालोजी भोसले यांच्या येथील गढीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे, तसा दर्जा समाधीला देण्यात यावा. कर्नाटकातील शहाजी राजे यांचे स्मारक केंद्रीय संरक्षित स्मारक आहे. शहाजी राजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारला विनंती करावी. तसेच वेरूळ व होदगिरे या दोन्ही समाधी स्थळांचा उत्तर प्रदेशात आग्रा येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या धर्तीवर स्मारक बांधून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.