ठाणे : नौपाडा येथील घंटाळी परिसरातील काका सोहोनी पथ जवळील महापालिकेची आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या इमारतीमधील एक मजला महिला बचत गटाला देण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपुर्वी पालिकेकडे मांडण्यात आला होता. मात्र, आरोग्य केंद्राच्या जागेत आरोग्य केंद्रच व्हावे, अशी भुमीका घेत हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला होता. परंतु प्रशासकीय कार्यकाळ सुरू असल्याने माजी नगरसेवकांना अंधारात ठेवत प्रशासनाने हीच जागा परस्पर ‘लाईट हाऊस’ या संस्थेला दिल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या जागेच्या वाटपाबाबत झालेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. तसेच या जागेत आरोग्य केंद्र होणार नसेल तर, ही जागा महिला बतच गटांना म्हणजेच महिला सक्षमिकरणासाठी द्यावी, अशी मागणी पेंडसे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बदलापूरः वांगणी ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच; शिवसेनेच्या शिंदे गटात फुट, महाविकास आघाडी निष्प्रभ

ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात शहरातील भुखंड नागरी सुविधांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. यापैकी अनेक भुखंड पालिकेने आरक्षणाप्रमाणे विकसित केले आहेत तर, काही भुखंडावर अतिक्रमण झाल्याचे यापुर्वीच पुढे आले आहे. याशिवाय, काही विकासकांकडून पालिकेला सुविधा भुखंडावर वास्तु उभारून देण्यात आल्या आहेत. नौपाडा येथील घंटाळी परिसरातील काका सोहोनी पथ जवळील महापालिकेच्या आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये आरोग्य केंद्र सुरु झालेले नसून त्यासाठी पालिकेकडून हालचाली होताना दिसून येत नाही. या उलट या जागेचा वापर मात्र इतर कामांसाठी होताना दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे शहरात रात्र निवारे उभारण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिकेने याच इमारतीच्या तळमजल्यावर रात्र निवारा उभारला. भर वस्तीत असलेल्या या इमारतीत उभारलेल्या रात्र निवाऱ्यास स्थानिक माजी नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. त्यावेळेस हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात असेल असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर याच इमारतीमधील एक मजला न्यायालयासाठी तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला आहे. या इमारतीचा एक मजला महिला बचत गटाला द्यावा अशी मागणी एका बचतगटाने २०१९ मध्ये केली होती. बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम आणि समुपदेशन केंद्र सुरू केले जाणार होते. मात्र, त्यावेळी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध करत पालिकेवर मोर्चा काढला. सभागृहातही या प्रस्तावाला विरोध झाला होता. आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या या इमारतीत आरोग्य केंद्रच व्हायला हवे, अशी भूमिका प्रस्तावास विरोध करणाऱ्या नेत्यांनी मांडली होती. त्यामुळे महिला बचत गटाला ही जागा नाकारण्यात आली. त्यानंतर आता हीच जागा लाईट हाऊस या संस्थेला देण्यात आली आहे. प्रशासकीय कार्यकाळ सुरू असल्याने माजी नगरसेवकांना अंधारात ठेवत प्रशासनाने ही जागा परस्पर ह्या संस्थेला दिली आहे, असा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. या जागेत आरोग्य केंद्र होणार नसेल तर, ही जागा महिला बतच गटांना म्हणजेच महिला सक्षमिकरणासाठी द्यावी, अशी मागणी पेंडसे यांनी केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण जवळील मोहने येथे १४९ वीज चोरांवर कारवाई; ४१ लाखाची वीज चोरी उघड

कोणत्या अधिकारात जागा दिली

सध्या आरोग्य केंद्राच्या या वास्तूत कोणताही आरोग्यविषयक उपक्रम राबवला जात नाही. महिला बचत गटाला नाकारलेली जागा लाईट हाऊस या संस्थेला प्रशासनाने कोणत्या अधिकारात आणि कशी काय दिली, ती जागा आरोग्य केंद्रासाठीच हवी या आपल्याच भूमिकेचा प्रशासनाला विसर कसा पडला, रात्र निवारा केंद्र आणि न्यायालयाला तात्पुरत्या स्वरुपात दिलेली जागा त्यांच्याकडून कधी काढून घेणार, असे अनेक प्रश्न पेंडसे यांनी उपस्थित केले आहेत. या आरोग्य केंद्रातील जागेच्या वाटपाबाबत झालेल्या गैरकारभाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी सखोल चौकशी करावी. लाईट हाऊस या संस्थेला दिलेली जागा तातडीने काढून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Space health center building in naupada private organization mrinal pendse allegations administration ysh