ठाणे : बाळासाहेब हे बाळासाहेब होते, मी बाळासाहेब होऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. सत्तेतून बाहेर पडलो. एवढ धाडस आम्ही दाखवले. पण काहींनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वत:च्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली, अशी टीका करत आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर टीका केली. बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे. पुढच्या वर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले. शिवसेनेमध्ये काम केले आणि शिवसेना मोठी करण्याचे काम केले. आम्हीदेखील बाळासाहेबांचे विचार घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील जनता त्याची साक्षीदार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा – ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी

महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण आम्ही केले. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. हा बाळासाहेबांचा मुलमंत्र आणि त्यांची शिक‌वण आम्ही आचरणात आणण्याचे काम केले. शासनाच्या अनेक योजना आम्ही सुरू केल्या. बाळासाहेबांचा विचार, विकास आणि आनंद दिघे यांचे सर्वसामान्य माणसाला न्याय देणे, यानुसार आम्ही काम करीत आहोत. यामु‌ळेच गेल्या अडीच वर्षात राज्याचा विकास झाला. विकासाचे प्रकल्प पुढे गेले. या सर्व योजनांचा फायदा लाडक्या बहिणी, भाऊ, तरुण आणि इतर सगळ्यांना झाला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – डोंबिवलीत काटई रस्त्यावर झाडांची रोपे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा

बाळासाहेबांचे स्वप्न होते की, सर्वसामान्य माणसाला न्याय देणे, तेच काम आम्ही गेल्या अडीच वर्षात केले. त्या कामाची पोचपावती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला दिली. यामुळेच महायुतीला अतिशय दैदिप्यमान असा विजय मिळाला. आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही इतके यश युतीला किंवा कोणत्याही पक्षाला मिळाले नव्हते. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे. यापुढे जे काही करायचे आहे, ते महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी करायचे आहे. त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर, देशभर बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जात असून कार्यकर्त्यांनी जयंतीचे औचित्य साधून शिवत्सोव आयोजित केला आहे, असेही ते म्हणाले.

जेव्हापासून आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून आमच्यावर आरोप सुरू आहेत. असा एकही दिवस गेलेला नाही की आरोप केले नाहीत. पण, मी आरोप केला नाही. जनतेने त्यांना उत्तर देत त्यांची जागा दाखवली. असेच आरोप करत राहिले आणि शिव्याशाप देत राहिले तर, वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाला लगावला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speaking to reporters in thane on thursday eknath shinde comment on uddhav thackeray group ssb