समीर जावळे
“जगा आणि जगू द्या हा जर नियम मान्य नसेल तर ठराव करा की मारु आणि मरुद्या.. सगळ्यांना मारु संपवून टाकू सगळ्यांना आणि सांगू त्या विधात्याला आम्हाला नाही आवडलाय तुझा हा खेळ…” ‘डोंबिवली फास्ट’ सिनेमात माधव आपटेच्या तोंडी हा संवाद आहे. त्यात तो डोंबिवलीतल्या परिस्थितीसाठी देवाला जबाबदार धरतोय असं दाखवण्यात आलं होतं. मात्र डोंबिवलीत जे काही सुरु आहे ते पाहिलं तर देव नाही; तर प्रशासन, यंत्रणा, हाताची घडी तोंडावर बोट ठेवलेली एमआयडीसी सगळे सगळेच गुन्हेगार आहेत.
१२ जून रोजी इंडस अलमाइन्स कंपनीला आग
एमआयडीसी पुन्हा एकदा १२ जूनला आगीच्या घटनेने हादरली. इंडस अलामाइन्स या कंपनीला आग लागली. कंपनी जळून खाक झाली आहे. आता उरलेत त्या कंपनीचे भग्नावशेष आणि इथे एक कंपनी होती जी जळून खाक झाली हे सांगणारे परिस्थितीजन्य पुरावे. त्याआधी मागच्याच महिन्यात अमूदान रिअॅक्टरचा स्फोट झाला. त्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. तर ६४ हून अधिक लोक जखमी झाले. १२ मृत्यू ही अधिकृत संख्या आहे. काही मृतदेहांचे हात, काहींचे पाय मिळाले त्यांची संख्या किती ते जाहीर करण्यात आलेलं नाही. अमूदान कंपनीचेही राख झालेले अवशेष तसेच आहेत. २३ मे च्या दिवशी झालेला हा स्फोट डोंबिवलीकर विसरलेले नाहीत. या स्फोटाला महिनाही व्हायच्या आत इंडस कंपनीला आग लागली.
हे पण वाचा- Dombivali MIDC Fire: इंडो अमाईन्स कंपनीला आग, परिसरात भीतीचं वातावरण
२४ मे २०१६ चा तो भयंकर स्फोट
डोंबिवलीतल्या याआधीच्या घटनाही अशाच भयंकर आहेत. २४ मे २०१६ या दिवशी प्रोबेस एंटरप्रायझेस या डोंबिवली एमआयडीसीतल्या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला. तसंच स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरलं. शेजारी असलेल्या सहा ते सात कारखान्यांचं मोठं नुकसान झालं. प्रसाद नावाचं एक हॉटेल होतं. त्याच्या काचा निखळून खाली पडल्या. तसंच दोन किमी परिसरातल्या इमारतींच्या काचा फुटल्या. या स्फोटात १६० लोक जखमी झाले होते. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर केली होती. त्यापैकी काहींना मिळाली, काही अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत हे भीषण वास्तव आहे.
२०११ पासून आग आणि स्फोटांच्या घटना
१८ मार्च २०११ या दिवशी घरडा केमिकल्स या कंपनीला आग लागली होती. त्यात दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. २२ सप्टेंबर २०११ या दिवशी पिंपळेश्वर मंदिराजवळ असलेल्या कपड्यांवर प्रक्रिया करणाऱ्या विनायक टेक्स्टाईल कंपनीला आग लागली त्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला. २५ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शारदा सिंथेटिक्स या कंपनीला आग लागली. यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही पण लाखो रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला. १२ मे २०१३ या दिवशी एमआयडीसीतल्या हेअर डाय कंपनीला आग लागली, एका कामगाराचा मृत्यू त्यात झाला. ३० जानेवारी २०१५ या दिवशी एमआयडीसी फेज २ च्या शनी मंदिराच्या मागे असलेल्या नार्केम कंपनीला मध्यरात्री १ च्या सुमारास आग लागली होती. ती आग नियंत्रणात आणण्यााठी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि नवी मुंबईतून अग्निशमन दलाचे बंब बोलावावे लागले होते.
हे पण वाचा- डोंबिवलीत आजदे गावात रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी, परिसरातील रहिवाशांचे येण्या-जाण्याचे मार्ग बंद
डोंबिवलीकर शांत आहेत
डोंबिवलीतल्या आगीच्या आणि स्फोटांच्या या घटना हादरवणाऱ्या आहेतच. पण डोंबिवलीकर हे सगळं शांतपणे पाहत आहेत, ज्यांच्या घरातला माणूस जातो त्या घराला वाईट वाटतं, ते घर पोरकं होतं. दुसरीकडे गेल्या पाच ते सहा वर्षांत गगनचुंबी इमारतींच्या जाहिराती, स्टेशनपासून अवघ्या २० मिनिटांवर रहिवासी प्रकल्प असल्याच्या जाहिराती, लोढा, रुणवाल आणि तत्सम सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प आदी आकर्षून घेणाऱ्या सवलतींचे बॅनर्सही लक्ष वेधून घेत आहेत. त्या ठिकाणी राहण्यासाठी लोकही आले आहेत. डोंबिवली हे शहर पूर्वेकडून आता आमिबासारखं पसरत चाललं आहे. शीळफाट्यापर्यंत प्रकल्प गेले आहेत. आगामी मेट्रो स्टेशनचं गाजर दाखवून प्रति स्क्वेअरफूटचा भाव वधारतो आहे. दुसरीकडे डोंबिवलीतल्या एमआयडीसीची परिस्थिती भीषण आहे.
एमआयडीसीच्या निवासी विभागाचं वास्तव काय?
एमआयडीसी परिसरातला जो निवासी विभाग आहे तो तयार करण्यात आला होता, चांगल्या हेतूने. एमआयडीसीत जे कामगार असतील त्यांना घरापासून कंपनी जवळ हवी हा उद्देश होता. प्रत्यक्षात आता या भागात हे कामगार फार प्रमाणात राहात नाहीत. अनेकांनी घरं विकली, अनेकांनी भाडे तत्त्वावर दिली आहेत. मराठी, गुजराती, मारवाडी, मुस्लीम, ख्रिश्चन. असे सगळेच लोक या एमआयडीसी भागात गु्ण्यागोविंद्याने राहतात. सोनारपाडा भागात आगरीबहुल वस्तीही आहे. कार्सची शोरुम्स, ढाबे, खाऊ गल्ल्या, बँक्वेट हॉल्स, हॉटेल्स या सगळ्यांनी हा परिसर गजबजलेला आहे. एमआयडीसी परिसरात जागा मोकळ्या होत्या त्यामुळे शाळाही बऱ्याच झाल्या आहेत. या सगळ्याला आवरण आहे ते एमआयडीसीतल्या कंपन्यांचं. फेज वन आणि फेज टू असे दोन भाग मधल्या भागात निवासी विभाग असा हा सगळा परिसर. स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतर. त्यामुळे या भागांत घरं घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. जुन्या असल्या तरीही पक्क्या इमारती, दोनच मजल्यांच्या इमारती. ऐसपैस घरं, २४ तास पाणी पुरवठा यामुळे लोक या भागाकडे आकर्षित होणं अगदीच समजू शकतो.
आश्वासनांचे ‘उपाय’
एमआयडीसी भागातल्या या आगीच्या आणि स्फोटांच्या घटनांनंतर त्यावर ‘उपाय’ म्हणून फक्त आश्वासनं मिळाली आहेत. मागच्या दहा-बारा वर्षांमध्ये ज्या दुर्घटना घडल्या त्याबाबत एमआयडीसी महापालिकेकडे, महापालिका सरकारकडे बोटं दाखवण्यात मग्न आहे. लोकांच्या जिवाशी खेळ चाललाय जो कुणालाच मान्य नाही. सरकारतर्फे “लवकरच इथल्या कंपन्या आम्ही पर्यायी जागेवर स्थलांतरित करु, जखमींचा खर्च सरकार करेल, मृतांच्या नातेवाईकांना इतक्या लाखांची मलमपट्टी करू वगैरे वगैरे…” या आश्वासनाची मलमपट्टी केली जाते. पुढच्या स्फोटाच्या किंवा आग लागण्याच्या घटनेची वाट पाहिली जाते.
२३ मे २०२४ ला झालेला स्फोटही भीषणच होता. या अमूदानच्या मालकांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या वकिलाने ‘अॅक्ट ऑफ गॉड’चा युक्तिवादही कोर्टात करुन झाला आहे. तो स्फोट म्हणे तापमान वाढल्याने झाला. यात बिच्चाऱ्या मालकांची काहीच चूक नव्हती. जी दुर्घटना घडली त्यानंतर बफर झोन कुठवर होता, तिथे इमारतींना संमती कशी मिळत गेली, कंपन्यांनी सुरक्षेचे उपाय योजले होते का, त्या न योजणाऱ्या कंपन्यांवर काय कारवाई झाली, याचाही सविस्तर उहापोह झालाय. जीव मुठीत घेऊन राहातात ते एमआयडीसी भागात राहणारे डोंबिवलीकर. घटना घडली की, हळहळतात आणि शांत बसतात तेही डोंबिवलीकर. भूतकाळातल्या चुकांमधून धडा घ्यायचा असतो. मात्र दहा वर्षांत फक्त चुकाच झालेल्या दिसतात. “आम्हाला विकास करायचा आहे, स्मार्ट सिटी करायची आहे.” वगैरे वगैरे घोषणा दिल्या जातात प्रत्यक्षात विकासाच्या नावाखाली टाईम बॉम्बच्या वातीवर डोंबिवली हे शहर वसवलं गेलंय हे आजचं धगधगतं वास्तव आहे!