शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी कल्याण-डोंबिवलीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी येणार आहेत. त्यानिमित्त शहरातील रस्त्यांची कामांची पाहणी उद्धव करणार आहेत; मात्र या वेळी शहरातील मोजकेच ‘चांगले रस्ते’ उद्धव यांना दाखविण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने झटून कामास आरंभ केला आहे.
रखडलेला कचोरे ते पत्रीपूल दरम्यानचा रेल्वे हद्दीतून गेलेला रस्ता दोन दिवसांत अभियंत्यांनी रेटून पूर्ण केला आहे. २०० मीटरच्या या नवीन रस्त्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली आहे का? रेल्वेने परवानगी दिली नसेल तर या रस्तेकामासाठी खर्च झालेला निधी कोणत्या लेखाशीर्षांखाली खर्च करण्यात आला, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
कचोरे ते पत्रीपूल दरम्यानचा दोनशे मीटरचा रस्ता रेल्वे हद्दीतून गेला आहे. रेल्वे या रस्त्याच्या जागेच्या बदल्यात पालिकेकडे २४ कोटी रुपये वा तेवढय़ाच दराची रेल्वे मार्गालगत जमीन मागत आहे. पालिकेने काही पर्याय रेल्वे अधिकाऱ्यांना सुचविले, पण ते रेल्वे अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. त्यामुळे दोनशे मीटरचा महत्त्वपूर्ण रस्ता अद्याप रखडलेला आहे.