पूर्वीच्या काळी भिवंडीच्या खाडीतून भिवंडी ते गुजरात (वसईमार्गे) व्यापार चालत असे. तांदूळ, लाकूड आणि कापड (हातमाग) या वस्तूंची मुख्यत्वे जहाजाद्वारे ये-जा या ठिकाणी होत असे. याच भिवंडीच्या खाडीतून दक्षिण भारतातही व्यापारासाठी जहाजे जात असत, किंबहुना म्हणूनच भिवंडीच्या या परिसराला ‘बंदर मोहल्ला’ या नावाने आजही ओळखले जाते. भिवंडीत आजमितीला दिसणारी मोठी कुटुंबे व्यापाराच्या निमित्तानेच या ठिकाणी आली असावीत, असे भिवंडीचा इतिहास उलगडताना लक्षात येते. घुले, कांड आणि मेकल ही भिवंडीतील मुख्य घराणी आहेत. साधारण दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी ही कुटुंबे भिवंडीत स्थायिक झाली असावीत. याबरोबरच कर्वे, शेटे, दुर्वे, ताम्हाणे, पिंगळे, वडके, समेळ, तासे, बरडी, फक्की, बुबेरे आदी कुटुंबेही भिवंडी आणि परिसरांत गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. भिवंडी गावात या कुटुंबीयांची भातशेती आणि सावकारी होती. त्यामुळेच आजही भिवंडीत काही भाताच्या गिरण्या पाहायला मिळतात. गावातील निजामपुरा, सौदागर मोहल्ला, बंदर मोहल्ला, भुसार मोहल्ला, तांडेल मोहल्ला, दर्गा रोड, सुतार आळी, हमाल आळी, ब्राह्मण आळी आदी परिसरांत जुन्या वास्तू आजही पाहायला मिळतात. गावातील काही वास्तूंची जागा उंचच उंच इमारतींनी घेतली असली तरीही काही जुन्या वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभी आहेत. भिवंडीतील ब्राह्मण आळीत असणारा ‘जोगळेकर वाडा’ हा त्यांपैकीच एक.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा