जनतेशी थेट संपर्क असलेले खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे वाहतुक शाखेच्या प्रमुखपदी उपायुक्त दर्जाचा अधिकारी असतो. गेल्याकाही वर्षांपासून या खात्याची ओळख ‘मलईदार’ खाते म्हणून झाली आहे. ठाणे वाहतुक शाखेच्या उपायुक्तपदावरून डॉ. विनयकुमार राठोड यांची बदली छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अधीक्षकपदी झाल्यानंतर या पदासाठी आता वाहतुक शाखेच्या प्रमुख पदासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ पाहयला मिळत आहे. त्यामुळे वाहतुक शाखेच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार अशा कुजबुज पोलीस दलात सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा >>> कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
ठाणे जिल्हा हा रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण, भिवंडीतील जुना आग्रा रोड, शिळफाटा, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर असे महत्त्वाचे मार्ग जातात. हे सर्व रस्ते ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातून वाहतुक करतात. भिवंडीत मोठे कारखाने आणि गोदामांचे जाळे आहे. त्यामुळे उरण जेएनपीटी, नाशिक येथून सुटणारी अवजड वाहनांची वाहतुक शहरातून होत असते.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील उपायुक्त दर्जाच्या पदावरील अधिकाऱ्याकडे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रापर्यंतचा वाहतुक शाखेचा कारभार आहे. दोन साहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतुक पोलिसांच्या १८ उपशाखा, वाहतुक पोलिसांची नियंत्रण शाखा तसेच ६०० अधिकारी, कर्मचारी असा असे बळ वाहतुक शाखेचे आहे.
हेही वाचा >>> आषाढ सहलीनंतर श्रावणात तीर्थयात्रा
या विभागाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या नागरिकांशी संबंध असतो. वाहतुक शाखेचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण क्षेत्रात अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर, महामार्ग सुरक्षा पथकाचे अधीक्षक मोहन दहिकर, छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त मीना मकवाणा या दोन अधिकाऱ्यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे. तर कल्याण परिमंडळाचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांचीही छत्रपती संभाजीनगर यथे दहशतवादी विरोधी पथकाचे अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. ठाणे वाहतुक शाखेचे पद हे ‘मलईदार’ विभाग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे आयुक्तालया बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांची वर्णी या दोन्ही ठिकाणी लागणार की इतर कोणत्या अधिकाऱ्याची अशी कुजबुज पोलीस दलात सुरू आहे.