कल्याण-डोंबिवली शहरांच्या विविध भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बांधण्यात येत असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाचा आदेश दुर्लक्षित करुन ओबडधोबड उंचवटे गतिरोधक बांधण्यात येत आहेत. या गतिरोधकांवर वाहने विशेषता चारचाकी हलकी, दुचाकी वाहने आपटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यांवर कोठेही गतिरोधक नकोत आणि बांधायचे असतील तर त्याचे चौकटबध्द नियम न्यायालयाने आखून दिले आहेत. गतिरोधकाची गरज आणि ते कोठे पाहिजेत, हे न्यायालयाने यापूर्वी काही याचिकांमध्ये निकाल देताना स्पष्ट केले आहे. असे असताना पालिका हद्दीत एमएमआरडीएच्या ठेकेदारांनी उंचवट पसरट ओबडधोबड गतिरोधक बांधून वाहन चालक, प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला आहे, अशी टीका प्रवाशांकडून केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली एमआयडीसीत वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी उंचवटे गतिरोधक एमएमआरडीएच्या ठेकेदाराकडून बांधण्यात आले आहेत. एमआयडीसीत कंपन्या, कामगार, रुग्णालये, शाळा आहेत. या सर्वांना या उंचवट्या गतिरोधकाचा फटका बसत आहे. या गतिरोधकांवर सफेद रंगाचे पट्टे मारण्यात आले नाहीत. काही ठिकाणी पट्टे मारले आहेत. ते पट्टे पाऊस पडला, दिवसभर वाहने त्यावरुन गेली की ते पट्टे निघून जात आहेत, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.हलक्या वाहनांमधून काही वाहन चालक शाळकरी मुलांची वाहतूक करतात. हे वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. उंचवट्या गतिरोधकांवरुन भरधाव वाहन नेताना नियंत्रणात नसेल तर शाळेच्या हलक्या वाहनाला अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीतील उंचवट्या गतिरोधकांवरुन दररोज तीन ते चार दुचाकी स्वार घसरुन पडत आहेत.

हेही वाचा >>>अंबरनाथः राज्यमार्गांवरील विद्युत खांबांच्या स्थलांतराची प्रतिक्षाच; रस्त्याचा मोठा भाग व्यापला, वाहनचालकांचा प्रवास धोकादायक

अशाच प्रकारचे उंचवटे गतिरोधक अलीकडे पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यानच्या काँक्रीट रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांच्या तळाला सपाटीकरण नसल्याने वाहन रस्त्यावर उतरताना जोराने आपटत आहे. काही वाहने जागीच बंद पडतात.डोंबिवली, कल्याण अंतर्गत भागात अनेक बंगले, इमारतींनी पालिकेच्या परवानग्या न घेता मनमानी पध्दतीने काँक्रीटचे, पेव्हर ब्लाॅक लावून, दगड, मातीचे उंचवटे गतिरोधक बांधले आहेत. डोंबिवली पश्चिममध्ये गुरुआशीष सोसायटी ते म्हामुणकर चौक दरम्यान काँक्रीटचे उंचवटे गतिरोधक बांधण्यात आले आहेत. या गतिरोधकांवरुन नेताना वाहन आपटत असल्याने या रस्त्यावरुन नियमित येजा करणाऱ्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण

पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात नागरिकांनी स्वताहून सोयीसाठी बांधलेले गतिरोधक काढून टाकण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी आपल्या ठेकेदाराला उंचवटे गतिरोधक वाहन चालकांना त्रास होणार नाही, अशा पध्दतीने बांधण्याची सूचना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.या गतिरोधकांना थर्मोप्लास्टिक रंगाचे पट्टे मारले तर ते चकाकीमुळे दूरवरुन दिसतात आणि वाहनांच्या दिव्यांनी परावर्तित होऊन वाहन चालकांना गतिरोधक असल्याचा इशारा देतात, असे एका जाणकाराने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed breakers on kalyan dombivli roads are fatal amy