किशोर कोकणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या, त्याबरोबर वाढणारा गुन्ह्यांचा आलेख आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीचे केंद्र ठरत असलेल्या ठाणे आणि नवी मुंबई या लगतच्या दोन पोलीस आयुक्तालयांना आता अधिक सक्षम होण्याचे वेध लागले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत येथील पोलीस ठाण्यांची संख्या अपुरी असल्याने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सात, तर नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात तीन नव्या पोलीस ठाण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या दहा पोलीस ठाण्यांसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठीही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबईच्या तुलनेत ठाणे, नवी मुंबईतील घरांचा पर्याय स्वस्त आहे. त्यामुळे ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, अंबरनाथ, नवी मुंबईतील वेगवेगळय़ा उपनगरांमध्ये नागरीकरणाचा वेगही मोठा आहे. नवी मुंबईतील शहरांमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे येथे कामानिमित्ताने येणाऱ्या नोकरदारांचे प्रमाण अधिक आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी येथील शहरी भागात ठाणे शहर पोलिसांचे कार्यक्षेत्र आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत, तर नवी मुंबई पोलीस ठाण्याची हद्द ऐरोलीजवळील दिघा ते तळोजापर्यंत आहे. नवी मुंबईत २० पोलीस ठाणे आहेत. असे असले तरी ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दी मोठय़ा आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास कामात अनेक अडथळे येतात.

काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे आठ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये दिवा, कौसा, नेवाळी, कारिवली, वंजारपट्टी, दापोडे, मानससरोवर आणि काटई या पोलीस ठाण्यांचा सामावेश होता. त्यानंतर पोलिसांनी कौसा पोलीस ठाण्याची आवश्यकता नसल्याने कौसा पोलीस ठाण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. पुन्हा सात पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्यानंतर ठाणे पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे जागेसंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. काही जागा पोलिसांनी सुचविल्या आहेत. नेवाळी येथील जागेसाठी सव्‍‌र्हे क्रमांक १०१, मानससरोवर पोलीस ठाण्यासाठी एका ट्रस्टच्या जागेचा काही भाग, काटई पोलीस ठाण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचा भूखंड, दिवा पोलीस ठाण्यासाठी आगासन येथील जागेचा सामावेश आहे. तर, उर्वरित तीन पोलीस ठाण्यासाठी जागेची जिल्हा प्रशासनास चाचपणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पोलीस ठाण्यांचा जागेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत येथे ऐरोली, उलवे भागात नागरीकरण वाढले आहे. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील ऐरोली, उलवे आणि विमानतळ पोलीस ठाण्याचा प्रस्ताव नवी मुंबई पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. 

ठाणे पोलीस आयुक्तालय

क्षेत्रातील नव्या सात पोलीस ठाण्याच्या जागेसंदर्भाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. – सुभाष बुरसे, उपायुक्त, मुख्यालय, ठाणे शहर पोलीस

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed up construction of new police stations in thane navi mumbai ysh
Show comments