उत्स्फूर्तता हा कोणत्याही वक्तृत्व प्रकाराचा जीव मानला पाहिजे. उत्स्फूर्तपणे जे तुम्हाला सुचते तेव्हा ते श्रोत्यांपर्यंत थेट पोहचलेले असते. त्यामुळे जो विचार बोलायला आपण उद्युक्त झाला होता त्या विषयावर माझा पूर्ण विचार झाला आहे का, याचा आधी विचार करा आणि मगच बोलायला लागा. अशाने उत्स्फूर्तता आपोआप येईल आणि ती श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध निवेदिका आणि सूत्रसंचालिका धनश्री लेले यांनी येथे केले. 

‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ ‘एनकेटी’ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी लेले यांनी ‘सूत्रसंचालनातील गमतीजमती’ या विषयावर अत्यंत रसाळ भाषेत बोलताना स्पर्धकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शनही केले. टीव्हीसारख्या प्रभावी माध्यमातून गेली अनेक वर्षे असाच संदेश दिला गेला की, कलेचे दोन प्रकार आणि ते म्हणजे नृत्य आणि संगीत. वक्तृत्व ही एक प्रभावी कला आहे याचा बहुधा अनेकांना विसर पडला असावा. वक्तृत्व ही एक कला भारतामध्ये होती अशी पौराणिक वानगी द्यावी लागते की काय अशी परिस्थिती अवतीभवती असताना ‘लोकसत्ता’सारख्या प्रभावी वर्तमानपत्रातून या स्पर्धेची जाहिरात पाहिली तेव्हा डोळे लकाकले आणि मन आनंदून गेले, असे गौरवोद्गार लेले यांनी या वेळी काढले. ही स्पर्धा भरवावी ती अभिजात मराठीमध्येच.
अशा स्पर्धामध्ये सहभागी होताना शब्दांच्या निवडीकडे अधिक कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. सूत्रसंचालन करताना शब्दांना तेवढेच महत्त्व आहे. माईकसमोर उभे राहणे सोपे असत, पण बोलणे नेमके अवघड. त्यामुळे शब्दाशब्दाचा विचार व्हायला हवा, असा सल्ला या वेळी त्यांनी उपस्थित स्पर्धकांना दिला.