विद्यापीठस्तरीय स्पर्धेत पदकांची कमाई
अॅथलेटिक्सच्या ७६व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठस्तरीय स्पर्धेत ठाणेकर श्रद्घा घुले व अक्षया अय्यर यांनी पदके प्राप्त करत चमकदार कामगिरी केली आहे. पटियालातील पंजाबी विद्यापीठ येथे २९ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठातर्फे खेळताना या खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.
पटियाला येथे पार पडलेल्या या स्पर्धेवेळी तापमान नऊ अंशांपर्यंत खाली उतरल्याने कडाक्याच्या थंडीत सकाळीच खेळावे लागत होते. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयाच्या श्रद्धाने लांब उडी प्रकारात ६.२७ मीटर अंतरावर उडी मारली. ज्यामुळे तिला सुवर्ण पदक मिळाले. या स्पर्धेत श्रद्धाने प्रत्येक उडी ही ६ मीटरच्या पुढेच मारल्याने तिला उत्कृष्ट महिला विजेतेपदाचा बहुमान यावेळी प्राप्त झाला.
दुसरी ठाणेकर अक्षया अय्यर ही माटुंग्याच्या आर. ए. पोद्दार महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने २०० मीटर धावण्यात कांस्य पदक मिळवले. यासाठी तिने हे अंतर २५.२७ सेकंदात पार केले. मात्र १०० मीटर धावण्यात अक्षया सहाव्या क्रमांकावर फेकली गेल्याने तिने सर्वाची निराशा केली. मात्र तरीही तिने २०० मीटर धावण्यात पदक मिळवत चांगले पुनरागमन केले.
सिंघानिया शाळेच्या अवघ्या बारा वर्षीय जय जैनचे शतक
शाळेचा संघ विजयी
प्रतिनिधी, ठाणे</strong>
कल्याणमधील प्रणव धनावडेने नाबाद १००९ धाव करण्याचा पराक्रम केल्यानंतर आता ठाण्यातील सिंघानिया शाळेत सातवीत शिकणाऱ्या अवघ्या बारा वर्षीय जय जैनने १०३ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. एमसीएच्या चौदा वर्षांखालील मुलांसाठी घंटाळी स्मृतिचषकासाठी लीगमध्ये खेळवले जाणारे सामने चालू असून यात पहिल्या सामन्यात ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेने ठाण्यातीलच एसईएस हायस्कूलवर विजय मिळवला आहे.
या सामन्यावेळी एसईएस हायस्कूलने ४५ षटकात सात गडी बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान सिंघानिया शाळेने ३२.१ षटकात ७ गडी राखून पार केले. जयच्या या शतकी कामगिरीने सिंघानिया संघाचा विजय सुकर झाला. यावेळी सिंघानिया संघातील ओमकेश कामतने नाबाद ५२ धावा व तेजस चव्हाणने १४ धावा केल्या. तर गोलंदाजीत आदित्य आठवलेने २ बळी व अपूर्व पिंगुरकरने १ बळी घेतला.
आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी, डोंबिवली
प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशन डोंबिवली पूर्व आणि एन. वाय. के. एस. खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने प्रगती करंडक या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांचा सहभाग आहे. रविवार, १० जानेवारीला डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हे सामने भरणार आहेत.
शाळा महाविद्यालयातूनही कबड्डीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आम्ही प्रगती करंडक या नावाने कबड्डीचे सामने दरवर्षी भरविण्याचा निर्धार केला. यावर्षी हे सामने आंतरमहाविद्यालयीन स्तरावर भरविण्यात येत असून, आंतरमहाविद्यालयीन स्तरावर मॅटवरील कबड्डीचे सामने भरविण्यात येत आहेत.
ऑर्डनन्सतर्फे राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धाना सुरुवात
अंबरनाथ : ऑर्डनन्स फॅक्टरीतर्फे आंतर विभागीय वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशातून ४२ कंपन्यांच्या पाच विभागातून १७०च्या वर स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक विद्यासागर वर्मा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ८ जानेवारी रोजी सायंकाळी शरीरसौष्ठव स्पर्धा आणि पारितोषिक वितरण होणार असल्याचे ऑर्डनन्सचे व्यवस्थापक अश्विनीकुमार भाटी यांनी सांगितले.
राज्यस्तरीय हँडबॉलमध्ये मुंबई संघाची बाजी
वार्ताहर, वाडा
वाडा येथे झालेल्या ३२व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत मुंबई जिल्हा संघाने सोलापूर संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकविला, तर सोलापूर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकूण २९ संघ सहभागी झाले होते. वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा झाल्या. या स्पर्धाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते झाले, तर बक्षीस समारंभ शिवसेना उपनेते आनंत तरे यांच्या हस्ते करण्यात आले.
समीर पाटीलची सागरी मोहीम फत्ते
प्रतिनिधी, ठाणे
अवघ्या दोन वर्षांपूर्वी पोहायला शिकलेल्या ३५ वर्षीय समीर पाटीलने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे अंतर ९ तास १ मिनिटात पोहून पूर्ण करत सागरी जलतरण मोहीम फत्ते केली. समीरने नव-वर्षांच्या पूर्वसंध्येला १२ अंश सेल्सियस तापमान असलेल्या पाण्यात पहाटे ३.२० वाजता धरमतरपासून पोहण्यास सुरुवात केली. दाट धुके आणि समुद्रातील पाण्याचा बदलता प्रवाह यावर मात करत समीरने दुपारी १२ वाजून १ मिनीट झाले असताना गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना हात लावला.
टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये नोकरी करणाऱ्या समीरने दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील किरण पाठक आणि सुजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहायला शिकायला सुरुवात केली. त्यानंतर साहसी सागरी जलतरण करण्याचा निर्णय पक्का करत समीरने रोज किमान चार तास पोहण्याचा सराव सुरू ठेवला. या मोहिमेच्या आधी समीरने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया, गोव्यात झालेली २५ किलोमीटर अंतराची स्विमथोन स्पर्धा, नौदलाच्या सागरी जलतरण स्पर्धेत आपला दम अजमावला होता. समीरच्या या यशाबद्दल ठाणे शहरातून त्याचे कौतुक केले जात आहे.
पाचवीतल्या हेजलची आशियाई कराटे स्पर्धेत पदकांची लूट
प्रतिनिधी, ठाणे
हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई
कराटे विजेतेपद स्पर्धेत ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या हेजल जॉन मॅथ्यू या
पाचवीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या वयोगटात सुवर्ण व कांस्य अशी दुहेरी पदके मिळवली आहेत. या
स्पर्धेत भारतासह सर्वच आशियाई देश सहभागी
झाले होते. यात हेजल हिने दोन लढतींमध्ये ही कामगिरी केली. हेजल पहिलीपासूनच कराटे खेळत असून तिने यापूर्वी झालेल्या तीन राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पदके मिळवली होती. तिने दुहेरी पदक मिळवल्याबद्दल शाळेकडून तिचे कौतुक करण्यात आले.
– संकेत सबनीस