ठाणे : राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या ‘महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा’ १२ वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आयोजित केल्या जाणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभाग घेणार आहे. हॉकी, फुटबॉल, धावणे, जलतरण, बॉक्सिंग यासारख्या १८ स्पर्धा ठाण्यात भरविल्या जाणार आहे. २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू आरक्षणातून भरती होत असतात. तर, काही पोलीस अधिकाऱ्यांना खेळाची आवड असते. राज्यातील सर्व पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धांमध्ये हजारो पोलीस कर्मचारी त्यांच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्त्व करत असतात. यावर्षी ठाणे शहरातील साकेत मैदानात या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २०१३ मध्ये ठाण्यात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, जलतरण, बास्केटबॉल, शरीर सौष्ठव, धावणे अशा एकूण १८ क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यातील काही स्पर्धा या साकेत मैदानात होणार आहेत. तर, काही स्पर्धा ठाणे पोलिसांच्या सिद्धी सभागृह, पोलीस कवायत मैदानात होणार आहे. या स्पर्धांमध्ये राज्यभरातील सुमारे ३ हजार ५०० पोलीस खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्या तरी त्याचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्पर्धेत विजेते झालेल्यांचा पारितोषिके देऊन गौरव केला जाणार आहे.