प्रतिनिधी, ठाणे :ठाणे येथील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘ब’ संघाने जेतेपद पटकाविले. या संघाने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘अ’ संघाचा सात गडी राखून पराभव करत पालकमंत्री चषकावर नाव कोरले.
महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर ठाण्यात टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा भरविण्यात येते. यंदा स्पर्धेचे आठवे वर्ष असून या स्पर्धा दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत १६ नामांकित संघ सहभागी झाले होते. रविवारी सकाळी एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘अ’ संघ विरुद्ध ‘ब’ संघ यांच्यात अंतिम सामना रंगला होता. नाणेफेक जिंकत ‘ब’ संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत १२६ धावा केल्या. संकेत भाये याने ३३ चेंडूंत नाबाद ३३ धावा तर रोहन राजे याने १२ चेंडूंत दोन षटकार आणि दोन चौकारांसह २७ धावा केल्या. ‘ब’ संघाचे गोलंदाज विकास रेपाळे यांनी चार षटकांत १६ धावा देऊन दोन गडी तर अक्षय पालकर, अतुल सिंग, जय नायक, जयेश पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. ‘अ’ संघाने १२६ धावांचे लक्ष्य ‘ब’ संघाने अवघ्या १७ षटकांत पार केले. स्वप्निल साळवी याने तीन षटकार आणि चार चौकारांसह २८ चेंडूंत ५४ धावा केल्या. निखिल पाटील (ज्युनिअर) यानेही दोन षटकार आणि दोन चौकारांसह ३१ चेंडूंत ३६ धावा करून संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी केली. ‘अ’ संघाचे विनायक भोईर, रोहन राजे, प्रसाद पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते विजेता ‘ब’ संघाला आकर्षक चषक आणि ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. उपविजेता ‘अ’ संघाला चषक आणि ३१ हजार रुपये रोख देण्यात आले. सामनावीर म्हणून स्वप्निल साळवी आणि विकास रेपाळे यांना गौरविण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पंच पिलू रिपोर्टर, सदानंद विशे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा