महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशीप बास्केटबॉल स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातील १८ वर्षांखालील मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. तर मुलांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकविला आहे. १९ ते २३ एप्रिल दरम्यान नाशिक येथे ही स्पर्धा पार पडली. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम लढत ठाणे व पुणे विभागामध्ये झाली. ठाणे जिल्हा गटाने १२ गुण जास्त मिळवून प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत फादर अॅग्नेल स्कूलमध्ये शिकणाऱ्या आणि डोंबिवली येथील अग्रज्ञेय व्यायम शाळेत बास्केट बॉलचे शिक्षण घेत असणाऱ्या साक्षी कोटीयन हिने मोलाची कामगिरी केली आहे. मुलांनीही चुरशीची लढत देऊन तृतीय क्रमांक पटकविला आहे. प्रशिक्षक आनंद फडके, सुजीत मोरे आणि नयन पटेल यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.
कबड्डी स्पर्धेत हनुमान क्रीडा मंडळ प्रथम
प्रतिनिधी, ठाणे
जांभूळ येथे झालेल्या आमदार चषक २०१६ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राहटोली येथील जय हनुमान क्रीडा मंडळ या संघाने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत जय हनुमान राहटोली व जय मल्हार-मूळगाव या दोन संघांत अंतिम सामना झाला. श्री समर्थ क्रीडा व भारतीय जनता पार्टी मंडळ जांभूळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे होते. जय हनुमान संघाने ५ गुणांनी हा सामना जिंकला. या सामन्यामध्ये मालिकावीर ठरलेल्या ओंकार गुडेकर याला पारितोषिक वितरण समारंभात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सोन्याची अंगठी व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जांभूळ भोई समाजाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे तसेच श्री समर्थ क्रीडा मंडळ व भोई समाज मंडळ, जांभूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी गोपेंद्रची निवड
प्रतिनिधी, ठाणे
कर्नाटक येथील उडपी प्रीमीयर लीगसाठी डोंबिवली येथील गोपेंद्र भोहरा याची निवड करण्यात आली. गोपेद्र भोवरा याने याआधीही अनेक स्पर्धामध्ये बाजी मारली असून प्रवीण आंब्रे यांच्याकडे त्याने टेनिस क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. गोपेंद्र व्हिक्ट्री क्लबतर्फे खेळणार असून देवेंद्र हडपे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेत ५० लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली असून ही स्पर्धा २६ एप्रिल ते १ मे या दरनम्यान कर्नाटक येथे पार पडेल.
साहसी क्रीडा प्रशिक्षणाला उदंड प्रतिसाद
महाराष्ट्र युवा संघ, ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन, मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था ठाणे व तालुका प्रशिक्षण केंद्र गोवेली अंतर्गत विशेष साहसी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये ट्रेकिंग, स्कुबा डायिव्हग,कायाकिंग, पोहणे, घोडेस्वारी, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, प्यारासिलिंग, प्याराग्लायडिंग, कराटे आणि आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचा युवक, युवतींनी लाभ घेतला.
तिसाई जत्रेत कुस्तीचा फड
प्रतिनिधी, ठाणे
कल्याण येथील तिसाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत १५५ पेहलवानांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सापडगावचा पेहलवान नरेश म्हात्रे व पिंपळकरचा पेहलवान विकी पाटील यांच्यामध्ये लढत रंगली. या दोघांनीही स्पर्धेत अंजिक्यपद पटकाविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा