तिसऱ्या राष्ट्रीय सूर्यनमस्कार स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अव्वल स्थान पटकावत स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. सूर्यनमस्कार फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य सूर्यनमस्कार संघटना यांच्या वतीने १७ व १८ एप्रिल दरम्यान सोलापूर येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कल्याणच्या मेरिडियन शाळेचा चैतन्य मोरे, ओंकार चव्हाण, अमोघ जाधव, साहिल मोरे, हर्ष जेसवानी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्याची भूतान येथे ४ ते १२ मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे महाराष्ट्र सूर्यनमस्कार संघटनेचे सचिव अविनाश दुधाने यांनी सांगितले. या सर्व खेळाडूंचे शाळेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांनी कौतुक करून खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बदलापूरच्या अथर्वची निवड
प्रतिनिधी, ठाणे</strong>
सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी बदलापूर येथील होली राइट स्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अथर्व पोवार याची निवड झाली आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान गोवा येथे पार पडलेल्या १८ व्या राष्ट्रीय भारतीय गोवा रोलर स्केटिंग स्पर्धेत अथर्वने रौप्यआणि ब्राँझ पदक पटकावले आहे. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा सप्टेंबरमध्ये पार पडेल. तिसरीत असल्यापासूनच अथर्व मनीषा गनवालिया यांच्याकडून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. अथर्वचे वडील खाजगी कंपनीत काम करतात. तर आई गृहिणी आहे.
खो-खो स्पर्धेत कल्याणचे युवक क्रीडा मंडळ तृतीय
प्रतिनिधी, ठाणे
भिवंडी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत कल्याण येथील युवक क्रीडा मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत खेळ विलक्षण रंगला होता, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील आठ संघांचा समावेश होता. ऐरोलीच्या क्रीडा मंडळाने प्रथम तर कोपरखैरणेच्या ग्रिफीन जिमखाना या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. राष्ट्रीय कीर्तीचे खो-खो खेळाडू कृष्णा माळी यांचे मार्गदर्शन युवक क्रीडा संघाला लाभले आहे.
क्रिकेट शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी,ठाणे
एस.पी ग्रुप क्रिकेट अॅकेडमीतर्फे ठाणे येथील सेंट्रल मैदानावर सकाळी ७ ते ९.३० ल सायंकाळी ४ ते ६.३० या वेळात सर्व वयोगटातील क्रिकेटपटूंसाठी १० जून पर्यंत उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे. हे वर्ग १ एप्रिलपासून सुरू झाले असून इच्छुकांना या शिबीरात सहभागी होता येईल. क्रिकेट प्रशिक्षणाव्यतीरीक्त क्रीडा मानसशास्त्र,अंपायरींग व स्कोरींगचेही प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच होतकरू खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोशिएशन मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये खेळण्याची संधीही मिळणार आहे.
जीवनदीपच्या श्रुती तरेची आशियाई पॉवर लििफ्टग स्पर्धेसाठी निवड
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
जीवनदीप शिक्षण संस्थेच्या गोवेली महाविद्यालयाच्या श्रुती तरे या विद्यार्थिनीची आशियाई पॉवरलििफ्टग स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या वरिष्ठ गटात निवड झाली आहे. १ ते ६ जून या कालावधीत आशियाई पॉवर लििफ्टग स्पर्धा उदयपूर येथे होणार आहेत.
महाविद्यालयाचे प्रशिक्षक प्रा.सुरेश चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या श्रुतीने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विद्यापीठ आणि आंतर विद्यापीठ पॉवर लििफ्टग स्पर्धेत यश संपादन करून अनेक पदके आणि स्ट्राँग वुमन किताब पटकावले आहेत. ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या आणि सुविधांचा अभाव असतानाही केवळ आपल्या जिद्दीने श्रुतीने यश संपादन केले आहे.
विशाल भोईर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी, ठाणे
संतोष क्रिकेट अकादमीच्या वतीने १३ वर्षांखालील मुलांसाठी विशाल भोईर स्मृती चषक २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. लेदर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील १६ क्लब आणि शाळेच्या संघांनी सहभाग घेतला असून तब्बल २२ दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत ट्वेंटी-२० सामने रंगणार असल्याची माहिती अकादमीतर्फे देण्यात आली. विशेष म्हणजे या क्रि केट स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे पंच काम पाहणार असून ते मार्गदर्शनही करणार आहेत.