प्रतिनिधी, ठाणे
५६वी ठाणे अखिल भारतीय ठाणे महापौर चषक शूटिंगबॉल स्पर्धा कळवा येथील यशवंत सायबा क्रीडा नगरीत पार पडली. या सामन्यात पुरुष गटामध्ये चंदिगडने उत्तर प्रदेश संघावर मात केली तर महिला गटात सांगली संघाने हरयाणा संघावर मात करून अव्वल स्थान पटकाविले.महाराष्ट्रराज्य शूटिंग बॉल असोसिएशन आणि नवजीवन क्रीडा मंडळ यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २९ एप्रिल ते १ मेदरम्यान झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ५० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश आणि चंदिगड या संघाची एकमेकांशी लढत झाली. या सामन्यात चंदिगडने उत्तर प्रदेश संघावर मात केली. चंदिगड संघातर्फे सुरेशकुमार व सुरींदर तर उत्तर प्रदेश संघातर्फे हरेंदर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. महिला गटात सांगली संघाने हरयाणा संघावर मात केली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्याहस्ते पार पडले. शूटिंगबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मनोज सुळे, कोषाध्यक्ष श्यामवीर सिंग, महाराष्ट्र शूटिंग बॉल स्पर्धेचे अध्यक्ष मनोहर साळवी यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

अर्णव पापलकर, इरा शहा विजेते
प्रतिनिधी, ठाणे</strong>
ठाणे जिमखाना ऑफिसर्स क्लब आणि धायगुडे स्पोर्ट्स अकादमी आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत १० वर्ष वयोगटामध्ये अर्णव पापलकर आणि इरा शहाने विजेतेपद मिळवले. मुलांच्या अंतिम फेरीत अर्णवने पापलकर याने स्वरमय सिंगचा ४-२ असा पराभव केला. उपान्त्य सामन्यात स्वरमय सुरुवातीला २-४ असा मागे पडला होता पण नंतर त्याने ६-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात वर्चस्व राखताना इरा शहाने स्वरा काटकरचा ४-० असा पराभव केला. उपान्त्य फेरीत इराने सानिका बुगडेचा ६-१ असा पराभव केला होता. ठाणे जिमखाना ऑफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टवर रंगलेल्या या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांमध्ये ८० आणि मुलींमध्ये ४० टेनिसपटू सहभागी झाले होते.

२०-२० स्पर्धेत जश गनिगा व आदित देगावकर यांची शतके
कल्याण : विशाल भोईर स्मृती चषक ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीने डोंबिवली बॉयस क्लबला दिलेले २२६ धावांचे आव्हान पेलवले नाही. संतोष स्पोर्ट्स अकादमीने उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच चोख गोलंदाजी करीत डोंबिवली क्लबला १३६ धावांतच गारद केले. कल्याण येथे सुरू असलेल्या विशाल भोईर स्मृती चषक स्पर्धेत संतोष स्पोर्ट्स अकादमीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. २० षटकाच्या या सामन्यात त्यांनी २२६ धावांचे आव्हान डोंबिवली क्लबला दिले. जश गनिगा व आदित देगावकर यांनी नाबाद शतक ठोकावत विजयात मोलाची कामगिरी केली. जश ने ३३ चेंडूत १०८ धावा तर आदित देगावकरने ५४ चेंडूमध्ये नाबाद १०० धावा बनविल्या. या विजेत्या संघास संघाचे प्रशिक्षक विवेक मोकाशी व संतोष पाठक यांचे मार्गदर्शन लाभले

बॅडमिंटन प्रशिक्षण शिबीर
ठाणे : कौस्तुभ विरकर बॅडमिंटन अकादमीतर्फे २५ एप्रिल ते २९ मेदरम्यान बॅडमिंटन खेळाचे शिबीर भरविले आहे. पलावा संकुल येथे आयोजित या शिबिरात डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथील १५० मुले सहभागी झाले आहेत. पाच आठवडय़ांच्या या शिबिरामध्ये ग्राऊंड ट्रेनिंग, कोर्ट ट्रेनिंग, योगा आणि कॅम्प टूर्नामेंट आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

श्रध्दा घुले हिला कांस्य पदक
ठाणे : २०व्या फेडरेशन कप नॅशनल सिनीअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१६ या स्पर्धेत ठाण्याच्या श्रद्धा घुले हिने कांस्यपदक पटाकवले आहे. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे २८ ते ३० एप्रिलदरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत श्रद्धाने ६.२१ मीटर लांब उडी मारून ठाण्याचे नाव उज्ज्वल केले. प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी तिचे कौतुक केले असून ती अ‍ॅचिव्हर्स या अकादमीमध्ये सराव करते.

साखळी क्रिकेट स्पर्धेत यूथ क्लब विजयी
प्रतिनिधी, ठाणे
तिसाव्या डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ‘अ’ गटात पहिल्या फेरीत आनंद भारती समाज संघाचा कर्णधार सम्राट नाखवाने युथ क्रिकेट क्लब विरुद्ध ३६ धावांत ५ बळी व नाबाद ५० धावा अशी अष्टपैलू चमक दाखविली. मात्र युथ क्रिकेट क्लबने आनंद समाज भारती संघावर मात करून विजय पटकविला आहे. या वेळी युथ क्रिकेट क्लबने २५.२ षटकांत १३६ धावा फटकाविल्या असून तर पराभूत आनंद भारती समाज संघाने २५ षटकांत ३ बाद १३९ धावा पटकाविल्या आहेत.

‘दादोजी’मध्ये प्रीमियर टी-२० क्रिकेट लीग
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे जिल्ह्य़ातील क्रि केटपटूंना व्यासपीठ मिळावे म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खेळण्यात येणाऱ्या प्रीमियर लीग २०१६ ही ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ ते ८ मे दरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ही स्पर्धा खेळवली जात असून त्यात ठाण्यातील आघाडीच्या क्रिकेट संघाचा समावेश आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर संजय मोरे, मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी आदी उपस्थित होते.
संकलन : भाग्यश्री प्रधान