बाजारपेठ, रोजगारासाठी मेळाव्याचे आयोजन करत असल्याचा संयोजकांचा दावा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील सुभाष छेद रस्त्यावरील मध्यवर्ति ठिकाणच्या भागशाळा मैदानात १४ दिवस कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुट्टीच्या काळात मुलांना मौजमजा करण्यासाठीच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका व्यापारी हेतुने मैदान मनोरंजनासाठी काही संस्थांना देऊन मुले, क्रीडाप्रेमी, ज्येष्ठांचा हिरमोड का करत आहे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

कोणत्याही परिस्थितीत पालिकेने डोंबिवली पश्चिमेतील एकमेव प्रशस्त भागशाळा मैदान कोकण किंवा अन्य कोणत्याही महोत्सवासाठी देऊ नये. भागशाळा मैदान हे पालिकेचे मैदान असले तरी नागरिकांच्या सोयींचा विचार करुन सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे स्वखर्चातून या मैदानाची देखभाल करतात. मैदान समतल, पाणी, बाकडे अशी व्यवस्था म्हात्रे यांनी मैदानात उपलब्ध करुन दिली आहे. स्वता काही करायचे नाही आणि दुसरा कोणी चांगले काम करत असेल तर त्यात विघ्न आणायचे ही पालिकेची भूमिका योग्य नाही, असे अंबरनाथच्या ‘डीएमसी’ कंपनीचे निवृत्त महाव्यवस्थापक सी. डी. प्रधान यांनी सांगितले. पालिकेला पैसा कमवायचा असेल तर त्यांनी इतर मैदानांचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी; इमारतीमधील सदनिका खाली करण्याचे पालिकेचे आदेश

दरवर्षी दिवाळीच्या सणाच्या काळात कडोंमपाकडून काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने भागशाळा मैदान महोत्सव, उत्सव कार्यक्रमासाठी १५ ते २० दिवसांसाठी दिले जाते. मैदानात विविध प्रकारचे खाऊचे बाकडे, कर्णकर्कश आवाजाची खेळाची साधने, मनोरंजन नगरी असा जामानिमा असतो. या कालावधीत मैदानात चालण्याच्या गोल मार्गिके व्यतिरिक्त एक इंच जागा मोकळी नसते. दररोज शेकडो वाहने महोत्सावासाठी येतात. मैदान परिसरातील अरुंद रस्त्यांवर ती उभी केली जातात. या भागात महोत्सव काळात दररोज वाहन कोंडी होते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>> ६१ दिवसात २५७३ किमी धावण्याचा विक्रम करुन; डोंबिवलीकर तरुणाची गिनिज बुकमध्ये नोंद

क्रिकेट संघटना विरोध

भागशाळा मैदानावर नियमित क्रिकेट, फूटबाॅल इतर खेळ प्रकार खेळणाऱ्या क्रीडाप्रेमींनी एक निवेदन आयुक्तांना देण्यासाठी तयार केले आहे. यामध्ये त्यांनी भागशाळा मैदान हे डोंबिवली पश्चिमेतील एकमेव देखणे आणि प्रशस्त मैदान आहे. या मैदानात शहराच्या विविध भागातून लहान मुले, ज्येष्ठ, वृध्द, क्रीडाप्रेमी येतात. पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत मैदान गजबलेले असते. अशा मैदानात पालिकेने कोणत्याही महोत्सवासाठी परवानगी देऊ नये. क्रीडाप्रेमी, नागरिकांची गैरसोय करू नये, अशी मागणी केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले. आमचा कोणत्याही महोत्सवाला विरोध नाही. त्यासाठी भागशाळा मैदान ही एकमेव जागा नाही. सुट्टीचा हंगाम सुरू आहे. मुलांना खेळायला हे एकमेव मैदान आहे. त्याचा त्यांना लाभ घेऊ द्यावा. महोत्सव झाल्यानंतर मैदानात खड्डे पडतात. त्यात पाऊ मुरगळून अनेक जण जखमी होतात. पालिकेने अन्य मैदानांचा अशा उत्सवांसाठी विचार करावा, असे क्रिकेटपटू नागेश पाटील यांनी सांगितले.

“मैदानाचा वापर हा खेळ, नागरिकांना फिरण्यासाठी असला पाहिजे. भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिमेतील एकमेव प्रशस्त, देखणे मैदान आहे. क्रीडाप्रेमी, नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा येथे प्रल्हाद म्हात्रे यांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सुविधांवर महोत्सवासारख्या माध्यमातून बोळा फिरविण्याचे काम पालिकेने करू नये.”

– दीपक पावशे, क्रीडाप्रेमी

“ महोत्सव झाल्यानंतर मैदान कचऱ्याने भरलेले असते. तंबू, वासे ठोकून मैदान उखडून टाकलेले असते. ही घाण वीस दिवस मैदानात पडून असते. या मैदान देखभालीची जी दररोज काळजी घेतली जाते. त्याच्यावर बोळा फिरवला जातो. याचे खूप वाईट वाटते. ”

– प्रल्हाद म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते

“ महोत्सवामुळे कोकणातील वस्तुंना शहरी भागात बाजारपेठ मिळते. रोजगार तयार होतो. म्हणून वर्षातील ३६५ दिवसांपैकी १४ दिवस हा महोत्सव आम्ही आयोजित करतो. राज्याच्या विविध भागातील सांस्कृतिक गाणी, कलांचा नागरिकांना लाभ घेता येतो. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्यांच्या हस्ते भागशाळा मैदानातील कोकण महोत्सवाचे ५ नोव्हेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे.”

– भाई पानवडेकर, कोकण महोत्सव संयोजक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports lovers protest against konkan mahotsava at bhagshala ground in dombivli ysh