सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा घोगरेने चांगली कामगिरी करत पदकेसंपादित केली आहेत. अडथळा शर्यतीत सुवर्ण व लांब उडीत कांस्य पदक मिळवत तिने राष्ट्रीय स्पर्धासाठीचा प्रवेश निश्चित केला आहे.
मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या अपूर्वाला १६ ते १७ जानेवारीदरम्यान सांगलीत पार पडलेल्या स्पर्धेत पहिल्या दिवशी लांब उडी क्रीडा प्रकारात कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. मात्र स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी १९ वर्षांखालील मुलींच्या गटाने १०० मीटर अडथळा शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. या कामगिरीमुळे अपूर्वाने केरळातील कालिकत येथे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये प्रवेश मिळवला आहे.
दक्षिण आशियाई स्पर्धामध्ये श्रद्धा घुलेची निवड
ठाण्यातील पहिली अॅथलिटपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत
ठाणे : राज्य व राष्ट्रीय स्तरावर गेली दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ठाण्यातील श्रद्धा घुले हिची मानाच्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या या स्पर्धेत श्रद्धा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
श्रद्धा घुले ही गेली अनेक वर्षे ठाण्यातून अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये उत्तम कामगिरी करत आहे. यासाठी तिला नुकताच राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारदेखील मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी व्हिएतनाम येथे आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये तिन कांस्य पदक पटकावले होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ती आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळली नव्हती. पण गेल्या दोन वर्षांत केलेल्या चांगल्या खेळामुळे तिची दक्षिण आशियाई स्पर्धासाठी निवड झाली आहे. यात भारत, चीन, नेपाळ, भूतान, श्रीलंका, पाकिस्तान आदी देशांचे प्रमुख खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती तिचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी दिली.
आशियाई कराटे स्पर्धेत ठाण्याच्या सनब्राइट अॅकॅडमीला पदके
ठाणे : तेलंगणा येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई बुडोकॉन कराटे स्पर्धेत ठाण्यातील सनब्राइट बुडोकॉन कराटे अॅकॅडमीच्या खेळाडूंनी पदकांची लूट केली आहे.
तेलंगणात झालेल्या या स्पर्धेत देशभरातून १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी विविध वयोगटांतील १२ खेळाडू हे सनब्राइट अॅकॅडमीचे होते. ठाण्यातील या खेळाडूंनी कराटेच्या कौशल्यांचे उत्तम प्रदर्शन करत १० सुवर्ण, ९ रौप्य व ४ कांस्य पदके मिळवली आहेत. यात वरिष्ठ गटात प्रतीक्षा डाकी व प्रियंवदा मौर्य यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच काटा व कुमिटे या दोन वेगळ्या बुडोकॉन कराटे प्रकारांसाठी झालेल्या या स्पर्धेत ठाण्यातील सृष्टी सुर्वे हिला सुवर्ण व कांस्य, प्रियंवदा मौर्य आणि सनिस्ता टिकू या दोघींना दोन सुवर्ण आणि सोहम शेडगे याला रौप्य व सुवर्ण, तर प्राप्ती वाघमारेला सुवर्ण व कांस्य अशी प्रत्येकी दोन-दोन पदके मिळाली.
युवाराज प्रतिष्ठानतर्फे क्रीडा महोत्सव
बदलापूर: युवाराज प्रतिष्ठानतर्फे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ते ३१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जलतरण स्पर्धा, टेबल टेनिस स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा आणि नेट बॉल स्पर्धा होणार आहेत. यातील जलतरण स्पर्धा पूर्वेकडील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे, तर टेबल टेनिस व बुद्धिबळ स्पर्धा या आदर्श विद्या मंदिर शाळेत होणार आहेत. तसेच नेट बॉल स्पर्धा नगरपालिका कुळगाव शाळेत होणार आहेत. क्रीडापटूंनी या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी महोत्सवाचे आयोजक आशीष दामले यांचे कार्यालय, बेलवली, बदलापूर (प.) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बदलापूर कबड्डी प्रीमियर लीगमध्ये मयूर ग्रुप विजेता
बदलापूर : बदलापूर गावातील छत्रपती क्रीडा मंडळातर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बदलापूर कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेत मयूर ग्रुप या कबड्डी संघाला विजेतेपद मिळाले आहे. या वेळी अंबरनाथ तालुक्यातून उत्कृष्ट खेळ खेळणारे आठ कबड्डी संघ सहभागी झाले होते.
बदलापुरात दरवर्षी होणाऱ्या कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेत तालुक्यातील निवडक संघ सहभागी होतात. या वेळी यातून केवळ दोनच क्रमांक काढण्यात येतात, ज्यांना अनुक्रमे वीस व दहा हजार रोख पारितोषिक देण्यात येते. यंदा झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामना हा मयूर ग्रुप व प्रमिला स्पोर्ट्स या बदलापूरमधीलच संघांमध्ये रंगला होता. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात १६-१८ गुणांनी मयूर ग्रुपने हा सामना जिंकला. या वेळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक मनोज ढिले यांनी दिली.
तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या ग्रंथाली कराडकरला कांस्य
कल्याण: बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयाच्या ग्रंथाली कराडकर हिने कांस्य पदक संपादित केले आहे.
बीड येथे २३ जानेवारी ते २७ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणची ग्रंथाली कराडकर सहभागी झाली होती. मुंबई विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याने तिला या स्पर्धेत थेट सहभाग मिळाला होता. १७ वर्षांखालील गटात ४८ व ५० किलो वजनी गटासाठी खेळत ग्रंथालीने बीड येथे कांस्य पदक पटकावले. तिच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाने तिचे कौतुक केले आहे.
तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : विक्रमी स्पोर्ट्स अॅकॅडमी व कल्याण स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. २३ व २४ जानेवारीदरम्यान कल्याणच्या वामनराव पै क्रीडांगण येथे पार पडलेल्या या स्पर्धाना तालुक्यातून २५० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे विजेतेपद कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाने पटकावले, तर उपविजेतेपद कल्याणमधीलच गुरू नानक शाळेने मिळवले. स्पर्धा समन्वयक म्हणून विलास वाघ यांनी काम पाहिले. या वेळी विजेत्यांना पदक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संकलन : संकेत सबनीस