डोंबिवली येथील घरडा सर्कल चौकात खड्ड्यांमधील लहान खडी रस्त्यावर पसरली आहे. या बारीक खडीवरुन वळण घेताना किंवा वेगाने जाताना दुचाकी घसरुन चालक रस्त्यावर पडत आहेत. दररोज १० ते १५ जण या वळण रस्त्यावर पडत आहेत, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले. डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावरील सर्वाधिक वर्दळीच्या घरडा सर्कल चौकात दोन महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. पालिकेने खडी, माती, काँक्रीट गिलावा टाकून हे खड्डे बुजविले आहेत.
आता पावसाने उघडिप दिल्याने खड्ड्यांमधील बारीक खडी मातीपासून विलग झाली आहे. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खड्ड्यांमधील खडी रस्त्यावर आली आहे. या भागात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत हवेत मातीचा धुरळा उडून हवा प्रदूषण वाढले आहे. बारीक खडी रस्त्यावर आल्याने दुचाकी खडीवर घसरुन चालक रस्त्यावर पडत आहेत. काही पालक मुलांना दुचाकीवरुन घेऊन शाळेत जातात. त्यांना या खडीचा फटका बसत आहे. एक डाॅक्टर या चौकात घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सावरकर रस्ता भागातील एक दाम्पत्य दुचाकीवरुन घसरुन पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या चार जणांवर ‘एमआरटीपी’चे गुन्हे
रस्त्यावर आलेली खडी पालिकेने लवकर दूर करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. घरडा सर्कलपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा अलीकडेच तयार करण्यात आला. चौकातील गोलाकार भागाचे काँक्रीटीकरण का करण्यात आले नाही. या चौकातील काँक्रीटीकरणाचे काम महत्वाचे होते, अशी नागरिकांची मागणी आहे.
कल्याण डोंबिवली पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने घरडा सर्कल चौकातील गोलाकार भागाचे काँक्रीटीकरण व्हावे यासाठी पुढाकार घ्यावा. बांधकाम विभागाचे अधिकारी जुमानत नसतील तर याप्रकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.