भिवंडीतील दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी आणखी एका शिक्षकाला अटक केली आहे. मोहम्मद अन्सारी या शिक्षकाचे नाव असून तो शेख वाजीर रेहमान याच्या सोबत करिअर एज्युकेशन नावाने खासगी शिकवणी चालवत होता.
गेल्या वर्षीची दहावीची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे गाजल्यानंतर यंदाही परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटीचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले होते. इतिहासाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जवळपास तासभर आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडली असून त्यापूर्वी विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिकाही परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी खासगी शिकवणी चालकाला अटक केली होती. या प्रकरणी आणखी दोन जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. यात भिवंडीतील एका शाळेच्या उपमुख्याध्यापकाचाही सामावेश होता.
रविवारी रात्री पोलिसांनी पेपरफुटीप्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक केली आहे. मोहम्मद अन्सारी असे या शिक्षकाचे नाव असून या कारवाईमुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. अन्सारी रेहमानसोबत भिवंडीत शिकवणी चालवत होता.