ठाणे – पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शनजवळ एसटी बस एका कंटेनरला धडकल्याने बसगाडीतील वाहकासह महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाहक अमर परब (३८) आणि गीता कदम (४१) अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन येथील ज्युपिटर रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावरून कंटेनर जात होता. त्याचवेळी या मार्गावरून बोरिवली येथे जाणारी एसटी बसगाडी आली. ही बसगाडी कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की बसगाडीच्या पुढील भागाचा चुराडा झाला. यात वाहक अमर परब आणि प्रवासी गीता यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बसगाडीत नऊ प्रवासी प्रवास करत होते.