कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून उतरून एका प्रवाशाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोलेहून निघालेली कल्याण बस स्थानकात जाणारी बस माळशेज घाटात आली असता वाहतूक कोंडीमुळे थांबली. बस थांबताच लघुशंकेला जाण्याचे कारण सांगत या व्यक्तीने बसमधून खाली उतरून थेट दरीत उडी घेतली. गणपत इडे असे या व्यक्तीचे नाव असून ते राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत वाहक आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य परिवहन महामंडळाची अकोले आगाराची बस बुधवारी सकाळी अकोले आगारातून कल्याण आगारात जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये गणपत इडे प्रवास करत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास एसटी बस माळशेज घाटात आली असताना वाहतूक कोंडीमुळे बस थांबली. गणपत इडे यांनी लघुशंकेचे कारण देत बसमधून उतरले. त्यांनी बसमधून उतरून थेट दरीत उडी घेतली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने गणपत इडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरीत काही अंतरावर इडे यांचा मृतदेह सापडला. मृतदेह शोधून शव विच्छेदन करण्यासाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. इडे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

इडे भंडारदरा येथील रहिवासी होते. ते राज्य परिवहन विभागाच्या सेवेत वाहक म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर रूजू होण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक संतोष दराडे यांनी दिली आहे. ते मानसिक तणावात होते असेही कळते आहे. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मृत गणपत इडे यांच्या बहिणीच्या ताब्यात मृतदेह सोपवल्याचेही दराडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus employee commits suicide in malshej ghat sgy