नालासोपारा आगारातून ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणाऱ्या राज्य परिवहनच्या बसचा मार्ग बदलल्याने वाढलेल्या अंतराचे भाडे प्रवाशांच्या माथी मारण्याचा प्रकार एसटी महामंडळाकडून केला जात आहे.
नालासोपारा महामार्गावरील रस्त्याच्या एका बाजूचे काम सध्या सुरू आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सहा रुपयांचा अतिरिक्त अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची पूर्वसूचना प्रवाशांना tv05देण्यात आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी बुधवारी नालासोपाराहून ठाण्याकडे येणारी एस.टी बस अडवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
नालासोपारा भागातून ठाणे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून दिवसाला सुमारे ३०हून अधिक गाडय़ांच्या फेऱ्या या भागांमध्ये होत आहेत. बुधवारी सकाळी ठाण्याच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना एसटीमध्ये बसल्यानंतर सहा रुपयांचे अधिकचे शुल्क आकारले जाऊ लागले. नव्या प्रवाशांनी तिकिटे काढली मात्र जुन्या प्रवाशांनी वाहकाशी या संदर्भात चौकशी सुरू केली. तेव्हा वाहकाने रस्त्याची कामे सुरू असून त्यामुळे बसचा मार्गा बदलला असून, त्याचे अधिकचे शुल्क आकारले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.
या स्पष्टीकरणाने समाधान होण्या ऐवजी प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला. प्रवाशांचा रोष पाहून वाहक आणि चालकांनी पोलिसांना पाचारण करून प्रवाशांविषयीची तक्रार केली. पोलिसांनी मध्यस्ती घेत प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही गाडी मार्गस्थ केली. रस्ता दुरुस्त होईपर्यंत हा प्रकार सुरूच राहणार असून त्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त आहे.
प्रवाशांची लूट..
रिक्षावाल्यांचा मनमानी कारभार आतापर्यंत अनुभवावयास मिळाला होता. एसटी महामंडळसुद्धा असाच प्रकार करत असून प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध वेगळ्या मार्गाने प्रवास करण्यास लावून त्याचे पैसेसुद्धा वसूल करायला लावण्याचा हा प्रकार आहे. नव्या प्रवाशांना हा प्रकार नवीन असला तरी जुन्या प्रवाशांचा संताप मात्र कायमच राहणार आहे. या प्रकारामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जात आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने यावर तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या गौरव कर्णिक यांनी व्यक्त केले.

Story img Loader