संत पीटर चर्च, अर्नाळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्नाळा ही मच्छीमारांची वस्ती. तेथे कोळी, वैती व मांगेला समाज पूर्वीपासून राहत आहे. कोळी बांधवांची वस्ती ही कुलाब्यापासून सलग अर्नाळापर्यंत आहे. कुलाब्यापासून वरळीपर्यंत तेथून दांडा मार्गे वर्सोवा-मढ आर्यलडपासून थेट उत्तन-अर्नाळापर्यंतच्या चिंचोळ्या किनारपट्टीवर मच्छीमार मत्स्य व्यवसायावर आपली उपजीविका चालवीत आले आहेत. त्यातील काही लोक ख्रिस्ती झाले, मात्र त्यांची मूळची आडनावे तशीच राहिली. इतर ख्रिस्ती बांधवांना जशी पोर्तुगीज पद्धतीची आडनावे मिळाली तशी ती कोळी बांधवांना मिळाली नाहीत. अर्नाळाचे ख्रिस्ती बांधव आपल्या उपासनेसाठी आगाशी येथील संत जेम्स चर्च येथे जायचे. आगाशी आणि अर्नाळा यांच्यामध्ये एक नाला आड येत होता. त्यांना तो पार करून जावे लागे म्हणून पलीकडच्या विभागाला नाव पडले आडनाला. त्याचा अपभ्रंश झाल्याने त्याचे आजचे नाव झाले ‘अर्नाळा’

या अर्नाळा गावात १९३० साली एक चर्च उभे राहिले. ते येशूच्या मच्छीमार प्रेषित, संत पीटर याला समर्पित करण्यात आले. त्याच्या उद्घाटनासाठी दमणचे बिशप उपस्थित राहिले होते, असे मार्बलमध्ये केलेले लेखन आजही आपल्याला वाचायला मिळते. अर्नाळा आणि आगाशी यांच्यामध्ये पूर्वी ‘प्रकाशाची राणी’ हे चर्च होते. पण ते इतिहासाच्या उलाढालीत नष्ट झाल्याने या नव्या चर्चने जुन्या चर्चची उणीव भरून काढली.

संत पीटर चर्च हे अर्नाळा समुद्रकिनारी आहे. त्याचा दर्शनी भाग पिश्चिमाभिमुख असल्यामुळे तोंडावरच्या पावसाचा मारा सतत या चर्चला सहन करावा लागतो. त्यामुळे या चर्चला असलेली उंचच उंच शिखरे अनेक वेळेला दुरुस्त करावी लागतात. त्यामुळे या चर्चचे मनोरे हे सतत टापटीप व आखीवरेखीव दिसतात. कारण त्यांची वारंवार सुधारणा व रंगरंगोटी होते.

चर्चच्या मालकीची एक शाळा आहे. तीसुद्धा संत पीटर या नावाने अस्तित्वात आहे. नजीकच्या काळात मराठी शाळेचे रूपांतर इंग्रजी माध्यमात झाले आहे. शाळेला पुरेसे पटांगण मिळाल्यामुळे गावातील महत्त्वाचे कार्यक्रम या पटांगणात होतात.

चर्चच्या प्रांगणात रस्त्यालगत धर्मगुरूंचा निवासस्थान होते. पावसाच्या माऱ्यामुळे व रात्रंदिवस होणाऱ्या एसटी बसच्या रहदारीमुळे ते निवासस्थान मोडकळीला येत गेले. म्हणून रेव्ह. फादर व्हेलेंटाइन पावकर यांनी चर्चला लागूनच धर्मगुरूंचे सुबक निवासस्थान तयार केले. त्यांनीच चर्चचा विस्तार विभाग याचा आराखडा तयार करत असताना संत पीटर या वेदीला आधुनिक स्वरूप दिल्यामुळे ती वेदी आखीवरेखीव झाली आहे.

अर्नाळ्याचे मच्छीमार जरी सूर लावून आपल्या बोलीभाषेत एकमेकांशी संभाषण करीत असले तरी प्रमाण मराठी भाषेवर त्यांचे इतर वसईकरांसारखे प्रभुत्व आहे. एक उल्लेखनीय बाब म्हणजे मराठी साहित्यात ख्यातकीर्त ठरलेले कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर हे मूळचे अर्नाळा गावचे. त्यांचा जन्म अर्नाळा गावात झाला. गावात त्यांचा गणपती बनवण्याचा पिढीजात कारखाना होता. मात्र बाबूराव लहानपणी स्थलांतरित झाले गिरगावला. तिथे उत्कृष्ट मराठी भाषेची व साहित्यिकांची जवळीक त्यांना मिळाल्यामुळे ते साहित्यिक झाले. त्यांनी एकामागून एक कादंबरी लिहिण्याचा सपाटा चालू केला. अनेक कादंबऱ्या त्यांच्या नावलौकिकामुळे आजवर वाचल्या जातात. अलीकडेच त्यांच्या साहित्य कृतीच्या आधारावर सतीश भावसार यांनी एक बहारदार पुस्तक लिहिले आहे, ते म्हणजे अर्नाळाच्या शिरपेचात रोवण्यात आलेला आणखीन एक तुरा होय.

सध्या फादर डॉ. मायकल रुझेरिओ हे या चर्चचे प्रमुख धर्मगुरू असून साहित्यात ज्यांचे नाव वारंवार ऐकायला मिळते ते फादर विकेश कोरिया हे तिथे कार्यरत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St peter church arnala