भाईंदरमधील कारखान्यांवर टाळेबंदीचा परिणाम

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : टाळेबंदीचा मोठा फटका भाईंदरमधील स्टील उद्योगांना बसला आहे. स्टीलच्या वस्तू बनविणारे भाईंदर हे देशातील प्रमुख शहर आहे. मात्र मालाची ठप्प झालेली मागणी, पडून असलेला कच्चा माल आणि कामगारांची टंचाई यामुळे स्टील व्यवसाय आर्थिक डबघााईला आला आहे.

भाईंदर  शहरात १० हजारांहून अधिक स्टील वस्तू निर्मिती करणारे कारखाने आहेत. भारतातील ८० टक्के स्टील वस्तूचे उत्पादन याच वसाहतीत घेतले जाते. भाईंदर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाला लागून भाईंदरपर्यंत फाटक तसेच नवघर नाक्यापर्यंत अशा संपूर्ण परिसरात स्टील वस्तूचे उत्पादन घेणारी औद्योगिक वसाहत आहे. यात प्रामुख्याने स्टीलच्या कच्च्या मालापासून कप , वाटी, ताट आणि मिक्सरसाठी लागणाऱ्या भांडयांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करण्यात येते. या वस्तूंची  संपूर्ण भारतातून मागणी करण्यात येते.

विशेष म्हणजे बर्फ ठेवण्याकारिता लागणाऱ्या भांडय़ाची मागणी  आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील येत असते. परंतु यंदा टाळेबंदीमुळे पूर्णत: उत्पादन आणि विक्रीच  बंद असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्याच्या टाळेबंदीचा मोठा फटका या स्टील कंपन्यांना बसला आहे.

टाळेबंदीनंतर अधिक पैसे देऊन कच्चा माल कसा खरेदी करावा, डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करावी तसेच स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना पुन्हा कसे थांबावे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

लग्न सोहळे टाळल्यामुळे मोठे नुकसान

करोनाचे संकट देशावर उन्हाळयात आले. याच काळात अधिक प्रमाणात लग्न सोहळे पार पडत असतात. त्यामुळे लग्न सोहळ्यात स्टीलच्या भांडय़ाची मागणी अधिक असते. याच काळात स्टीलच्या वस्तूची होणारी विक्री करून  उद्योजकांना नफा होत असतो. परंतु यंदा सर्वच लग्न सोहळे रद्द झाल्यामुळे तसेच औद्योगिक वसाहती  बंद असल्यामुळे वर्षभराचे नुकसान झाल्याचे उद्योजकांना वाटत आहे.

कामगारांची कमतरता

टाळेबंदीचा सर्वात मोठा फटका कामगार वर्गाला बसला आहे. त्यामुळे दोन वेळच्या अन्नाकरिता धडपड करणारा कामगार सर्व सुरळीत झाल्यावर आपल्या गावी जाण्याची घाईत आहे. त्यामुळे टाळेबंदीनंतर देखील  औद्योगिक वसाहती सुरू ठेवणे हेदेखील कठीण होणार असल्याची भीती उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे.

टाळेबंदीमुळे आर्थिक डबघाईला आलेल्या स्टील व्यवसायातील उद्योजकांना आता शासन मदतीची गरज आहे. करात सवलत दिल्यास हा व्यवसाय पुन्हा उभा राहू शकतो.

– शैलेश पांडे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टील उद्योग असोसिएशन.