ठाणे : मुंबईतील रखडलेली गृहप्रकल्प टप्प्या-टप्प्याने मार्गी लावून मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यात इतर भागात रखडलेली गृहप्रकल्प मार्गी लावून नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याचे धोरण असल्याचे शिंदे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची संगणकीय सोडत समारंभ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडला. यावेळी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. म्हाडाचे नवे धोरण आणले जात आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना परडवणारी घरे, श्रमिक महिला, जेष्ठ नागरीक आणि विद्यार्थ्यांसाठी घरे किंवा हॉस्टेल अशा प्रकारचे धोरण आणले जात आहे. याशिवाय रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देखील पावले उचलण्यात आली आहेत.

राज्यात रखडलेली गृहप्रकल्प म्हाडा, झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरण (एसआरए), सिडको, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), औद्योगिक विकास महामंडळ यासह इतर प्राधिकरणाच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने मार्गी लावणार आहोत असे शिंदे म्हणाले. मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याची भूमिका असल्याचे शिंदे म्हणाले. चेंबुरमध्ये १७ हजार घरांचा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीच्या माध्यमातून केला जात आहे. झोडपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. प्रत्येकाला मुंबईला घर मिळावे यासाठी प्रयत्न असणार आहे असेही त्यांनी सांगितले. नागरिकांना मिळणारे घर चांगल्या दर्जाचे असावे अशी आमची भूमिका आहे. तसेच आशियातील सर्वात मोठ्या समूह पूनर्विकास प्रकल्प (क्लस्टर) ठाण्यात मान्यता दिलेली आहे. ठाण्यात चार ते पाच ठिकाणी क्लस्टरचे काम सुरु झाले असल्याचेही ते म्हणाले.