कल्याण– ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहावरील अरुंद जिन्यावरुन येजा करताना प्रवाशांना दररोज चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतो. या चेंगराचेंगरीत महिला प्रवासी, विद्यार्थ्यांची सर्वाधिक कुचंबणा होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहावर मुलुंड बाजुला अरुंद जिना आहे. या जिन्यावरुन मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याणकडून येणारे जाणारे प्रवासी येजा करतात. एकाचवेळी पाच आणि सहावर दोन्ही बाजुने लोकल आल्या की फलाट पाच आणि सहा वरील अरुंद जिन्यावरुन चढ उतार करताना प्रवाशांना धक्केबुक्के खात जिन्यावरुन प्रवास करावा लागतो. हा सकाळ, संध्याकाळचा नेहमीचा प्रकार आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे रेल्वे पुलाच्या देखभालीची मागणी

अनेक प्रवासी घाईघाईने लोकल पकडण्यासाठी जिन्यावरुन उतरत असतात. ते इतर प्रवाशांचा विचार न करता धक्काबुक्की करत जिना उतरत असतात. या धक्काबुक्कीमुळे दररोज या जिन्यावर प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत असते, असे प्रवाशांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थी या जिन्यावरुन येजा करतात. त्यांनाही दररोज या धक्काबुक्की, प्रसंगी चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतो. महिला प्रवाशांना तर जीव मुठीत घेऊन जिना उतरावा लागतो. अनेक महिला जिन्यावरील गर्दी कमी झाल्या शिवाय जिन्यावरुन चढ उतार करत नाहीत.

या जिन्याच्या भागात दररोज गर्दी होत असल्याने रेल्वे सुरक्षा जवानांनी या जिन्यावर उभे राहून प्रवासी येजा करण्याचे दोन्ही मार्ग नियंत्रित केले पाहिजेत. परंतु, तसे होत नाहीत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ठाणे रेल्वे स्थानकात येणार असले की फक्त त्यावेळी पुरते रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे स्कायवाॅक, जिन्यावर गर्दीचे नियंत्रण करण्याचा देखावा उभा करतात. अधिकारी निघून गेले की मग कोणीही या भागात फिरकत नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

हेही वाचा >>> विचारमंथन व्याख्यान: लोकमान्य टिळक हे आधुनिक इतिहासातील भारताचे नेते – डॉ. सदानंद मोरे

अरुंद जिन्याच्या दोन्ही बाजुला स्टिलचे आधार कठडे आहेत. या कठ्ड्यांच्या उतार भागात काही कठडे वाकविलेले नाहीत. त्यामुळे जिन्यावरुन उतरताना या स्टिलच्या कठड्याचे शेवटचे टोक अनेक वेळा प्रवाशांना टोचते. घाईत असलेल्या प्रवाशाचा शर्ट, पिशवी या कठड्याच्या शेवटच्या टोकाला अडकते, असे प्रवाशांनी सांगितले. फलाट क्रमांक पाच आणि सहावरील वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन रेल्वेने या जिन्याचे रुंदीकरण करावे. नवीन जिना पूर्ण होईपर्यंत या भागात गर्दीच्या वेळेत सकाळ, संध्याकाळ रेल्वे सुरक्षा जवाना तैनात राहतील अशी प्रवाशांची मागणी आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट पाच आणि सहावर दररोज गर्दी होते, हे माहिती असुनही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. प्रशासन काही अपघाताची वाट पाहत आहे का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stampede fear at thane railway station due to narrow staircase on station zws