ठाणे : ऐरोली आणि ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी विखुरण्यासाठी तयार करण्यात आलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तत्काळ सुरू करा अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. राजन विचारे यांनी नुकतीच मध्य रेल्वे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेतली. तसेच दिघा गाव व ऐरोली रेल्वे स्थानकात नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी व त्यांच्या प्रतिक्रिया गोयल यांच्याकडे सुपूर्द केल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून लाखो प्रवासी नवी मुंबईत कामानिमित्ताने प्रवास करतात. कळवा, दिघा, विटावा भागातील प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे किंवा ऐरोली रेल्वे स्थानकात यावे लागते. त्यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी होत असते. ही गर्दी विखुरण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिघा गाव रेल्वे स्थानक तयार करण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबर २०१६ मध्ये एमयुटीपी तीन प्रकल्पाअंतर्गत या स्थानकास मंजुरी मिळाली होती. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दिघा स्थानक तयार करणे आणि दुसऱ्या टप्प्यात कळवा ऐरोली उन्नत मार्गिका तयार केली जाणार आहे.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय अधिकारी तृणाली महातेकर निलंबित, रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरण

हेही वाचा – आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य कापावे लागणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्टीकरण

२०१८ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यातील पहिला टप्पा म्हणजेच, दिघा गाव स्थानक तयार झालेले आहे. परंतु याठिकाणी अद्यापही रेल्वेगाड्या थांबविल्या जात नाहीत. काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी दिघा गाव स्थानक सुरू व्हावे यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेतली. तसेच त्यांना स्वाक्षऱ्या आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुपूर्द केल्या. दिघा गाव रेल्वे स्थानक जनतेसाठी उपयोगात येऊ द्या नाहीतर नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start digha gaon station otherwise we will protest warns mp rajan vikhare to railways ssb