लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: कल्याण डोंबिवली शहराच्या १३५ चौरस किलोमीटर हद्दीत कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस ठराविक रस्ते आणि भागात प्रवासी वाहतूक करतात. या बस शहरातील प्रत्येक रस्त्यावर धावतील असे नियोजन करा. अन्यथा, येत्या काही दिवसात पालिकेच्या परिवहन कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा ‘उबाठा’ पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी परिवहन प्रशासनाला दिला आहे.

कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांची जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह शहरप्रमुख सचीन बासरे, विजया पोटे, रवी कपोते, हर्षवर्धन पालांडे, अरविंद पोटे, विजय काटकर, दत्तात्रय खंडागळे यांच्यासह भेट घेतली. केडीएमटी परिवहुन उपक्रमाच्या १५० हून अधिक बस असुनही कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांना त्याचा काही उपयोग होत नाही. कल्याण, डोंबिवली शहरांचे नागरीकरण झाले आहे. विस्तारित भागात जाण्यासाठी प्रवाशांना रिक्षासाठी दररोज २५ रूपयांपासून ते ६० रूपयांपर्यंत भाडे मोजावे लागतात. उच्चपदस्थ नोकरदार वर्गाला हे भाडे परवडण्याजोगे असते. परंतु, सामान्य, कष्टकरी वर्गाला हा खर्च परवडत नसल्याने तो शेअर रिक्षा किंवा पायी प्रवास करतो.

आणखी वाचा-ठाणे: शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांची मराठा समाजाच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार

यामुळे परिवहन उपक्रमाने कल्याण, डोंबिवली शहरे, २७ गाव भागात केडीएमटीच्या बस सुरू केल्या तर या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे साळवी यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. बसगाड्यांच्या शहरातील फेऱ्या वाढल्या तर बहुतांशी प्रवाशांना दिलासा मिळेल. उपक्रमाचा महसूल या माध्यमातून वाढेल, असे साळवी यांनी सांगितले. उपक्रमाच्या ताफ्यातील ८० बसगाड्या सध्या प्रवासी वाहतूक करत आहेत. बसगाड्या उपलब्ध झाल्यावर त्याचे शहराच्या विविध भागात नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी शिष्टमंडळाला दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start kdmt buses within kalyan dombivli city thackeray group officials demand mrj