पावसाळी सुटीनंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळांवर
पावसाळ्यामुळे अडथळ्याचा आणि घाटमाथ्यावरून उताराचा धोकादायक प्रवास लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेली माथेरानची मिनी ट्रेन गुरुवारपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाली. त्यामुळे आता माथेरानचे निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ‘माथेरानच्या राणी’मधून दऱ्याखोऱ्यांतील गर्द हिरवाई अनुभवत ‘हिल स्टेशन’वर पोहोचता येणार आहे.
मुंबईच्या जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख गेलेल्या माथेरान हे गिरिस्थान तेथील मिनी ट्रेनमुळेसुद्धा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरते. पावसाळय़ातील हवामान, दरडी कोसळण्याचा धोका, घाटमाथ्यावरील उताराचा धोका यांमुळे नेरळ ते माथेरान असा प्रवास करणारी मिनी ट्रेन १६ जूनपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्याच वेळी माथेरान ते आमन लॉज हा काही अंतराचा प्रवास मात्र भर पावसामध्येसुद्धा सुरू होता. आता गुरुवारी १५ ऑक्टोबरचा मुहूर्त साधून ‘मिनी ट्रेन’ पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे.
या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे आतापासून माथेरानमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने या गाडीमध्ये सुधारणा करण्याबरोबर चांगल्या दर्जाचे इंजिन या गाडीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मिनी ट्रेनचे आकर्षण
’१९०७ साली सुरू झालेली ही गाडी २००५ सालच्या अतिवृष्टी आणि पावसाळ्यातील सुट्टी अशी अपवादात्मक परिस्थिती वगळता अखंड धावत असते.
’धिम्या गतीने डोंगरावर चढणारी ही गाडी प्रवाशांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. त्यामुळे माथेरानला येणारा प्रत्येक पर्यटक या गाडीतून प्रवास केल्याशिवाय राहत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा