कल्याण- कल्याण-शिळफाटा रस्ता, शिळफाटा-महापे, नवी मुंबई, पनवेल रस्त्यावरील वाढती वाहन संख्या आणि या भागातील वाढते उद्योग व्यवसाय विचारात घेऊन शिळफाटा रस्त्यावर येणारा वाहनांचा ताण आणि वाहतूक कोंडीचा विचार करुन कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाने तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग हा ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा हा विस्तारित मार्ग आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, पनवेल, तळोजा हे एकमेकांना थेट जोडले जातील. त्याचा नागरी वस्तीसह ग्रामीण भागालाही फायदा होणार आहे. कर्जत, कसारा, कल्याण, भिवंडी, डोंबिवली परिसरातून नोकरदार, व्यावसायिक ज्या संख्येने मुंबई, पश्चिम मुंबईत जात आहेत. तेवढ्याच प्रमाणात प्रवासी नवी मुंबई, पनवेल, अलिबाग दिशेने जात आहे. हा वाढता भार रेल्वे, रस्ते वाहतुकीवर येत आहे. या गर्दीचे विभाजन करण्यासाठी कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग मार्गी लागणे आवश्यक आहे, असे खा. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. तर विविध मार्गांवर येत्या काळात प्रवास सोयीचा आणि जलद होणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण – डोंबिवली – तळोजा ( मेट्रो 12) या मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे या मेट्रोसाठी आग्रही आहेत. या मेट्रो मार्गामुळे ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी ते कल्याण आणि कल्याण येथील  प्रवासी थेट तळोजा आणि नवी मुंबईला जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीला महत्व प्राप्त झाले आहे. या एकूण २०.७५ किलोमीटरच्या मार्गात १७ स्थानक प्रस्तावित करण्यात आली आहेत.

कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरू होणार आहे. पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीण भागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वीच सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार समितीला तातडीचे योग्य ते निर्देश द्यावेत आणि कामाला सुरुवात करावी, अशी मागणी खा. शिंदे यांनी केली आहे.

मेट्रो स्थानके

कल्याण कृषी बाजार समिती, पिसवली गाव, गणेशनगर, डोंबिवली एमआयडीसी, गोळवली, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, कोळेगाव, हेदुटणे, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसावरे आगार, पिसावरे आणि तळोजा.