ठाणे : देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे. महिषासुराचे मर्दन करणारी आहे. महाराष्ट्रात जे जे महिषासुर निर्माण झाले आहेत. त्यांचे मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. मागील वर्षी वातावरण वेगळे होते. मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत.
आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी बनावट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आमचा एक नेता, एक झेंडा, एक मैदान असल्याचेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना दिले आहे. मी सुद्धा मराठवाड्यातील आहे. मला या आश्वासनांची चांगली माहिती आहे. आम्ही मराठवाड्यातील लोक या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचे दानवे यावेळी म्हणाले.
हेही वाचा >>> ठाणे: देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळात राडा; दगडफेक आणि फटाके पेटविल्याने पाच जखमी
भाजपचे आशिष शेलार यांच्यावरही दानवे यांनी टीका केली. आशिष शेलार यांना इतिहास कमी माहिती असेल, आज एनडीएमध्ये कोणत्या विचारांचे कोणते पक्ष सामील आहेत, हे सुद्धा त्यांनी जाहीर करावे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा सरकार स्थापन केले, त्यात मुलायम सिंग होते, फर्नांडिस, दंडवते होते ते कोणत्या विचारांचे होते. हे सर्व समाजवादी विचारांचे होते आणि म्हणून आशिष शेलारांनी इतिहास तपासावा. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असतील तर शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचे दानवे म्हणाले.