ठाणे : ब्रिटिशांनी भारतीयांची पारंपरिक ज्ञानाधारित शिक्षण पद्धती उध्वस्त करून देशातील कौशल्य संपवले आणि त्यामुळे उद्योग करण्याची मानसिकता हरवली होती. मात्र नवे शैक्षणिक धोरण हे उद्योग क्षेत्राला पाठबळ देणारे आहे असे प्रतिपादन राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण आराखडा व नवीन शिक्षण धोरण’ या विषयावरील शिक्षण परिषदेच्या समारोपवेळी ते बोलत होते.
लोढा पुढे म्हणाले, शिक्षक हा एक धर्म आहे. शिक्षक असणे ही समाजाची सेवा आहे. भारतीय गुरुपरंपरेचे आधुनिक रूप म्हणजे शिक्षक, तर पिढी घडवणे ही त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. भारतीय समाज व्यवस्थेत शिक्षकांचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे. त्याचप्रमाणे नवीन शिक्षण धोरणामुळे कौशल्य विकास आणि उद्योजकता यांना गती मिळणार आहे. मेकॉले पद्धतीत अमूलाग्र बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अशा प्रकारची परिषद शैक्षणिक धोरण राबवण्याकरता उपयुक्त ठरते. शैक्षणिक धोरण शिक्षकांच्या पुढाकारावर अवलंबून असते. जगाच्या पाठीवर भारतीय विद्यार्थी चमकावे यादृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे शिक्षण धोरण राबवले आहे. तब्बल सहा वर्षे या धोरणावर अभ्यास करण्यात आला आणि आता त्याची अंमलबजावणी होत आहे. या धोरणामुळे उद्योजकता विकासालाही चालना मिळणार आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी म्हणजे शिक्षक, पालक, संस्थाचालक यांनी एकत्रितपणे या धोरणाची अंमलबजावणी होईल असे विशेष लक्ष दिले पाहिजे असे लोढा म्हणाले.
यावेळी आमदार निरंजन डावखरे म्हणाले, आई-वडिलांनंतर मूल सर्वाधिक सुरक्षित शिक्षकांकडे असते. शिक्षकांनी विद्यार्थी घडवताना समाज आणि् देश घडवण्याच्या जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. पूर्वी पदवी घेतल्यावर नोकरी मिळवणे एवढाच उद्देश होता. मात्र आता विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास करून त्यांना उद्योजक बनवणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पारंपरिक शिक्षणानंतर मिळणाऱ्या मर्यादित संधींपेक्षा कौशल्याधारित शिक्षणामुळे चांगल्या संधी मिळतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे यश शिक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन हे धोरण यशस्वी आणि परिणामकारक करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत असे म्हणत पालघर येथेही अशाच प्रकारची परिषद आयोजित करण्याची इच्छा डावखरे यांनी व्यक्त केली.