उल्हासनगर – उल्हासनगरातील अन्टेलिया गृहप्रकल्पात उभारण्यात आलेल्या उल्हासनगर पालिकेच्या तात्पुरत्या कोव्हीड रुग्णालयाचे अत्याधुनिक रूग्णालयात रूपांतर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी याचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी विविध आधुनिक आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध असणार असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
उल्हासनगर येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या गेलेल्या कोविड रूग्णालयाचे कायमस्वरुपीच्या एका अत्याधुनिक रूग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरु होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने या रूग्णालयाचे काम नुकतेच पूर्ण झाले. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले असून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. या रुग्णालयाचा फायदा हा केवळ उल्हासनगरच नव्हे हा आसपासच्या शहरातील नागरिकांना देखील होणार असून तातडीच्या उपचारासाठी नागरिकांना ठाण्याला जावे लागणार नसल्याचे, मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तर कोणत्याही खासगी रूग्णालयाला लाजवेल असे हे सुविधायुक्त मोठं रूग्णालय असून येथे एकही रुपया खर्च न करता मोफत उपचार मिळणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या या रूग्णालयात कुठेही फी स्वीकारण्याचे कांऊटर नसेल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर येत्या काळात उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयही कामगारांसाठी लवकरच खुले केले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपील पाटील, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख उपस्थित होते.
हेही वाचा – माझ्या जीवाचे काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार – खासदार राजन विचारे
रुग्णालयाची वैशिष्ट्ये
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये ३२ खाटांचा अतिदक्षता विभाग असून एकूण २०० खाटा आहेत. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना येथे मोफत आरोग्य सुविधा देणार आहे. यात क्ष किरण विभाग, सिटी स्कॅन, २ डी इको, सोनोग्राफी आणि कॅथलॅबसह ५ सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष असणार आहे. हृदय, मेंदू, पोट आणि कर्करोगसारख्या प्रमुख ४६ गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया आणि इतर १ हजार २०० विविध शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येथे होतील. खासगी रूग्णालयाप्रमाणे येथे २४ तास डॉक्टर उपलब्धता, वातानुकूलित सुविधा, रुग्णाला ३ वेळेचा पौष्टिक आहारही दिला जाणार आहे.