बदलापूर : मुरबाडहून शहापूरला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला बुधवारी अपघात झाला. या अपघातात ही बस पलटली. यात ३५ प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुधवारी दुपारी मुरबाडहून लेनाडमार्गे शहापूरला जाणारी बस कुडवली गावाजवळ एका वळणावर अपघातग्रस्त झाली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून मोकळ्या जागेत शिरली. यावेळी बस उलटल्याने एकच खळबळ उडाली. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मुरबाड आगाराचे अधिक्षक योगेश मुसळे यांनी दिली. या अपघातात बहुतेक प्रवाशांना किरकोळ दुखापत आणि खरचटले असून तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाचे फॅक्चर होते अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. या अपघाताचे नेमके कारण कळू शकलेले नाही.