पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियानचे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कॅन्सरने ग्रासले होते. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या मागे पत्नी प्रा. नीता व मुलगा निमिष व मोठा मित्र असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ठाण्याहून भिवंडीकडे निघालेल्या एसटी बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे ७० प्रवाशी बचावले

गेली दीड वर्षे ते कर्करोगामुळे आजारी होते. उपचारानंतर महिनाभरपूर्वीच ते या आजारातून बरे झाले होते. परंतु त्यांना पुन्हा कर्करोगाची आजाराची लागण झाली. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वतः उपचार थांबविण्यास सांगितले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा कोलबाड येथील परीधी सोसायटीमधील राहत्या घराजवळून दुपारी ३.३० वाजता निघणार असून जवाहरबाग येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत.

संजीव साने साथी मधु लिमये जन्मशताब्दी समारोह समितीचे निमंत्रक होते. त्यांनी आणीबाणी विरोधी कार्यापासून सामाजिक , राजकीय कामाला सुरुवात केली.त्यांनी राष्ट्रसेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले,ते समता आंदोलन, समाजवादी जनपरिषदचे संस्थापक सदस्य व पूर्णवेळ कार्यकर्ते होते.ते एन्रॉन विरोधी कृती समितीचे सह निमंत्रक व रायगड मधील सेझ आंदोलनाचे सह निमंत्रक होते.जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात ते स्मृतीशेष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात एन.डी. सरांच्या सोबत निमंत्रक म्हणून काम केले आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे विश्वस्त होते. त्यांचा विचारवेध संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता.वडघर ( माणगाव) येथे झालेल्या तेराव्या विचारवेध संमेलनाचे ते संयोजक होते. त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे.

हेही वाचा- कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्डेमय; सुस्थितीत रस्ते खोदून सेवा वाहिन्या टाकण्यास नागरिकांचा विरोध

वर्ल्ड सोशल फोरम या मुंबईतील कार्यक्रमाचे संयोजक, ठाण्यातील मतदार जागरण अभियानाचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनी
स्वराज्य इंडिया अभियानतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील कॉलेजमध्ये ‘बळीराजांची मुले मुली’ हा कार्यक्रम घेऊन प्रबोधनाचे काम केले आहे. ते ठाणे येथील वी नीड यू सोसायटीचे सदस्य व कार्याध्यक्ष होते. त्यांनी संस्थेतर्फे पैसे गोळा करून कोरोना काळात कष्टकरी असंघटित वर्गातील सातशे लोकांना एकंदर सहा महिने दररोज जेवण दिले.त्यांनी कोरोना काळात पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी मानधन गोळा करून अर्थसाह्य प्रकल्पही सुरू केला होता.

त्यांनी चळवळी आणि आंदोलनाच्या निमित्ताने विविध पुस्तकांचे लिखाणतसेच वर्तमानपत्रात सदर लेखन केले आहे. त्यांनी सेवाग्राम कलेक्टिव्ह तर्फे महाराष्ट्रातील पूर्णवेळ शंभर सामाजिक कार्यकर्यांना गांधींजीं विषयी तीन खंड व डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांचे मुलांसाठी विवेकानंद आदी विचार प्रवर्तक पुस्तकांच्या प्रती पाठवण्यात पुढाकार घेतला होता. संजीव साने यांनी डॉ. यशवंत सुमंत यांच्यासोबत पुणे येथील महात्मा फुले वाडा ते गांधींचा वर्ध्याचा आश्रम ‘ महात्मा ते महात्मा’ या ऐतिहासिक पदयात्रेचे संयोजनात सहभाग घेतला होता.

हेही वाचा- भाज्यांचे दर आवाक्याबाहेर; परतीच्या पावसाचा परिणाम; किमतीत २५ ते ३० टक्के वाढ ; आणखी महिनाभर परिस्थिती कायम

संजीव साने यांनी रेमिंग्टन या टाईपरायटर कंपनीत नोकरी केली. मालकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही कर्मचारी कंपनी चालवू असा प्रस्ताव देऊन काही काळ कंपनी चालविली. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान आल्याने ही कंपनी बंद झाली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक, राजकीय कार्यात झोकून दिले. त्यांनी आप पार्टीच्यावतीने ठाणे लोकसभा निवडणूक लढवली होती. संजीव साने यांना वर्धा येथील दाते संस्थेच्यावतीने डॉ.भा.ल. भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार तसेच निळू फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State vice president of swaraj abhiyan sanjeev sane passed away thane dpj