ठाणे : महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचे कर्तृत्व दाखवून दिले आहे, असे कौतुकोद्गार काढत देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत असल्याचे मत भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र कधीही थांबणार नाही. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा सरकारला पाठिंबा आहे, असा दावा करत केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील मावळी मंडळ शाळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विविध संस्थांच्या माध्यमातून शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० हून अधिक कंपन्या आणि २० हून अधिक महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याठिकाणी पाचशेहून अधिक नागरिकांनी नोकरीसाठी नोंदणी केली. या कार्यक्रमात बोलताना आमदार केळकर यांनी महिलांचे कौतुक केले. नोकरीबरोबर कौशल्य देखील विकसित करा. सुरुवातीलाच तुम्हाला टेबल खुर्चीची नोकरी मिळणार नाही. परंतु कुठेतरी नोकरीची सुरुवात केली पाहिजे. कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नये. जे काम मिळेल ते करून स्वतःचे विश्व निर्माण केले पाहिजे. सुरुवात करा आणि कामाला लागा. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण अनेक नोकऱ्या उपलब्ध करू शकतो. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी होतकरू तरुणांचा युवा प्रशिक्षण योजनेत सहभागी करून त्यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी शासनाकडे केली आहे, असे केळकर यांनी सांगितले. महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचे कर्तृत्व दाखवून दिले आहे. देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत आहे. महाराष्ट्र कधीही थांबणार नाही. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा सरकारला पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.

मल्लखांब हा अस्सल मराठी खेळ आहे. विविध आसने करू शकतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम देणारा एकमेव प्रकार म्हणजे मल्लखांब. समर्थ सशक्त सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर आरोग्य चांगले कमवावे असा सल्ला पद्मश्री उदय देशपांडे यांनी तरुणांना यावेळी दिला. नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. परंतु नोकरीबरोबर कौशल्य देखील अंगीकारा जेणेकरून रोजगार मिळेल असा सल्ला त्यांनी दिला. नोकरी शोधणारे हे नोकरी देणारे झाले पाहिजेत. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा मेळावा हे उत्तम व्यासपीठ आहे, असे आमदार निरंजन डावखरे म्हणाले. उमेदवारांनी पगार न पाहता कुठून तरी आपल्या आयुष्याची सुरुवात होते हे पाहून नोकरी स्वीकारावी, असे जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी सांगितले. यावेळी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत, स्नेहा पाटील, डॉ. राजेश मढवी, महेश कदम, सिताराम राणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.