कल्याण- राज्य शासनाकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या वर्ग एक अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती ही तीन वर्षासाठी कालबध्द असते. तीन वर्षानंतर किंवा अशा अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्याची त्या पालिकेतून बदली केली जाते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली कल्याण डोंबिवली पालिकेत नोव्हेंबर २०१८ मध्ये येऊन, त्यांचा प्रतिनियुक्ती तीन वर्षाचा कालावधी संपुनही शासनाने त्यांची आतापर्यंत बदली न केल्याने शासकीय, पालिका अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेतील खड्डे विषयांवरुन गेल्या तीन वर्षापासून प्रशासन टीकेचे लक्ष्य होत आहे. रस्ते बांधकाम, खड्डे हा विषय शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्या अधिपत्त्याखाली आहे. रखडलेले कोपर, पत्रीपूल, वडवली हे पूल मार्गी लावण्या व्यतिरिक्त नवीन कोणताही विकास आराखड्यातील रस्ता, आदर्शवत प्रकल्प उभारण्यात बांधकाम विभागाने गेल्या तीन वर्षात महत्वपूर्ण कामगिरी बजावली नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर्षी जून-जुलै सुरू झाला तरी १५ कोटीची तरतुद असताना कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले नाहीत. ही खड्डे भरणीची कामे जून पूर्वी पूर्ण करणे आवश्यक असताना. या कामांसाठी प्रभागातून साहाय्यक अभियंत्यांनी एप्रिल मध्ये प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावावर जूनमध्ये कार्यवाही करुन जुलै मध्ये खड्डे भरणी कामाच्या निविदा काढण्यात आल्या, अशी माहिती माहिती अधिकारात उपलब्ध झाली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण डोंबिवली शहरात गेल्या सप्ताहात आले होते. पालिका मुख्यालयाला दिलेल्या भेटीच्या वेळी स्मार्ट सिटी प्रकल्पा बरोबर शहरातील खड्ड्यांवरुन आयुक्तांना खडेबोल सुनावले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्ते, खड्डे विषयांवरुन शहर अभियंता कोळी यांना लक्ष्य केले. सपना कोळी या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अधिपत्त्याखालील विभागातून त्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून पालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्या आहेत. डोंबिवलीतील काही जागरुक नागरिकांनी कडोंमपाला कार्यक्षम शहर अभियंता शासनाकडून देण्याची मागणी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.
२ जुलै २०१८ रोजी अधीक्षक अभियंता कोळी यांना शासन आदेशावरुन कडोंमपामध्ये शहर अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर २०१८ पासून प्रतिनियुक्तीने त्या या पदावर कार्यरत आहेत, अशी माहिती नगरविकास विभागाने माहिती अधिकारात दिली आहे. जुलै २०१८ मध्ये कोळी पालिकेत शहर अभियंता पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. एका पालिका अभियंत्याला शहर अभियंता व्हायचे असल्याने तत्कालीन आयुक्तांनी किरकोळ कारण उपस्थित करुन कोळी यांना त्यावेळी हजर करुन घेतले नव्हते. त्यानंतर पाच महिन्यांनी त्यांनी पुन्हा पालिकेत येऊन शहर अभियंता पदाचा पदभार स्वीकारला होता. करोना काळात तत्पर करोना काळजी केंद्र उभारण्यात कोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. कर्जबुडव्या विभा कंपनीच्या जागेवर डोंबिवली एमआयडीसीत करोना केंद्र पालिकेने उभारल्याने हे प्रकरण वाद्ग्रस्त झाले. फेब्रुवारीमध्ये कोळी यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी विभागाकडे अर्ज दिला होता. पालिकेने त्यांची कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे शासनाला कळविले होते. मे मध्ये या अर्जाची अंतीम मुदत होती. परंतु, पालिकेतील कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना शहर अभियंता पदाचा पदभार देण्याची वेळ येऊ नये म्हणून माजी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कोळी यांना मुदत वाढविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला असल्याचे समजते. पहिल्या वर्षीच्या मुदतवाढ मंजुरीनंतर शासनाने कोळी यांच्या प्रतिनियुक्तीला मुदतवाढ मंजुरी दिली नाही. कडोंमपा पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने कोळी यांना मुदतवाढ मिळावी म्हणून पालिकेकडून प्रयत्न झाले नसल्याचे सांगितले. यापूर्वी नवी मुंबई पालिकेत त्यांनी शहर अभियंता पदासाठी प्रयत्न केले होते.