अंबरनाथमध्ये महिला दुकानदाराच्या तोंडावर बेशुद्ध होण्याचे औषध फवारून दुकानात चोरी केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेनेच ही चोरी केली असून ही महिला सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.अंबरनाथ पूर्वेच्या मोहन पुरम भागात निशा चव्हाण यांचे आशीर्वाद स्नॅक्स कॉर्नर हे उपहारगृह आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास निशा चव्हाण या दुकानात असताना एक महिला त्यांच्याकडे आली आणि तिने त्यांच्याकडे फोन करण्यासाठी मोबाईल मागितला.
हेही वाचा >>>कल्याण: “मनसे बरोबर युती म्हणजे…” महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवले म्हणाले…
मात्र निशा यांनी तिला नकार देताच तिने निशा यांच्या तोंडावर एक औषध फवारले. त्यामुळे निशा चव्हाण या बेशुद्ध पडल्या. काही वेळाने निशा यांना शुद्ध आल्यानंतर त्यांनी दुकानात पाहिले असता, त्यांच्या दुकानातून ३ ते ४ हजार रुपयांची रोख रक्कम या महिलेनलने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानात चोरी करणारी ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेला शोधून कारवाई करण्याची मागणी निशा चव्हाण यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.