डोंबिवली – घरकामासाठी येणाऱ्या एका गृहसेविकेने डोंबिवलीत आपल्या मालकाच्या घरातील कपाटातील तिजोरीतून पाच लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गृहसेविके विरूध्द गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
डोंबिवली पूर्वेतील गडकरी पथावरील सीकेपी हाॅल जवळील सृष्टी सुदामा सोसायटीत हा प्रकार राजेश रामचंद्र सोमवंशी या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घडला आहे. रामनगर पोलिसांनी गृहसेविका साक्षी गणेश मोरे (३६) या गृहसेविकेला अटक केली आहे. ही गृहसेविका डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रस्त्यावरील उमेशनगर भागात राहते. मंगळवारी सकाळी गृहसेविका नेहमीप्रमाणे मालक राजेश सोमवंशी यांच्या घरी कामासाठी आल्या होत्या. काम करत असताना राजेश यांची नजर चुकवून गृहसेविका साक्षी यांनी शयन खोलीतील कपाटातील तिजोरीतून सोन्याचे घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख ९८ हजार रूपयांचा ऐवज चोरला, असे राजेश यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा >>>विवाहासाठी घेतलेल्या लाखो रुपयांच्या साड्या घेऊन चोरटे पसार
गृहसेविका निघून गेल्यानंतर कपाटातील आतील रचनेत काही बदल झाल्याचे राजेश यांना दिसले. त्यांनी तिजोरी तपासली तर त्यात ऐवज नव्हता. घरात चोरी झाली नसताना ऐवज गेला कोठे असा प्रश्न राजेश यांना पडला. त्यांनी गृहसेविकेकडे विचारणा केली. तिने याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. राजेश यांनी साक्षी मोरे यांच्यावर संशय घेऊन तक्रार केली. पोलिसांनी साक्षी यांची चौकशी केली. त्यांच्या जबाबात तफावत आढळली. त्यामुळे मोरे यांनीच चोरी केली असल्याचे पोलिसांचे मत झाल्यावर साक्षी यांच्या विरूध्द गन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते या प्रकरणाचा तपास करत आहेत.