कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बेकायदा चाळी, इमारतींना कोपर पश्चिमेतील पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून २५० हून अधिक जलवाहिन्यांच्या माध्यमातून चोरुन पाणी पुरवठा केला जात आहे. या जलवाहिन्या कोपर पश्चिम रेल्वे स्थानका जवळील नाल्यातून रेल्वे रुळाखालून कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात आणण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री सभागृहात येताच तोंडाला कुलूप!, ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची भाजपची मागणी पण..
दररोज हजारो लीटर पाण्याची चोरी भूमाफियांकडून होत असताना कल्याण डोंबिवली पालिकेचा पाणी पुरवठा विभाग याविषयी अनभिज्ञ असल्याने या भागातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. २५० हुन अधिक जलवाहिन्या कोपर पश्चिम रेल्वे स्थानका जवळील नाल्यातून रेल्वे रुळाखालून कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बेकायदा चाळी, इमारतींना पाणी पुरवठा करण्यासाठी भूमाफयांनी आणल्या आहेत. या वाहिन्यांमुळे रूळ, खडी, स्लीपरना धोका निर्माण झाला असताना रेल्वेचे तंत्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थानक अधिकारी याविषयी गुपचिळी धरुन बसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नाल्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहिन्या नेण्यात आल्याने नाल्याचा प्रवाह खंडीत होऊन तेथे कचरा साचून राहतो.डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई असल्याने तेथे टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. चाळी, झोपडपट्टी भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत कोपर पश्चिमेत भूमाफियांनी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला बेकायदा छिद्र पाडून तेथून२५० हून अधिक वाहिन्या पूर्व भागात नेल्याने रेल्वे मार्गाला धोका निर्माण होईल अशी भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. भूमाफियांनी कोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसर, आयरे गाव हरितपट्ट्यातील मोकळ्या सरकारी जमिनी हडप करून त्यावर १४ बेकायदा इमारती, तीन हजाराहून अधिक चाळी बांधल्या आहेत. या बांधकामांना पूर्व भागातून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने माफियांनी कोपर पश्चिमेतून वाहिन्यांमधून चोरुन पाणी पुरवठा घेण्यास सुरूवात केली आहे. कोपर पूर्व, आयरे गाव भागात बेकायदा चाळी वाढतात. त्याप्रमाणात पश्चिमेतून पाणी चोरुन आणण्याचे प्रमाण वाढत आहे, असे एका स्थानिकाने सांगितले.
हेही वाचा >>>कल्याण: कोल्हापूरच्या ट्रक चालकाला लुटणारा तडीपार गुंडास कल्याणमध्ये अटक
कोपर पूर्व, पश्चिमेतील स्थानिकांनी याविषयी तक्रारी केल्या तर माफियांकडून त्रास होण्याची शक्यता असल्याने रहिवासी गुपचिळी धरून आहेत. कोपर रेल्वे स्थानक भागात वाळू माफियांकडून रेल्वे मार्गाला धोका निर्माण केला जात आहे. आता रेल्वे रुळाखालून जलवाहिन्या नेण्याचा प्रकार घडत आहेत. हे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना, स्थानक व्यवस्थापकांना दिसत नाही का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. या चोरीच्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल दरवर्षी बुडत आहे.या भागातील रेल्वे मार्गाजवळील जलवाहिन्यांची पाहणी करून त्या बेकायदा असतील तर तोडून टाकण्यात येतील, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
“कोपर पश्चिम ते पूर्व भागात नाला, रेल्वे मार्गाखालून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांची माहिती घेऊन त्या तातडीने खंडित करण्याची प्रक्रिया केली जाईल. ”-किरण वाघमारे,कार्यकारी अभियंता,पाणी पुरवठा विभाग.
“आयरे गाव, कोपर पूर्व भागातील बेकायदा बांधकामांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. काही बांधकामांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भागातील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जातील.”-संजय साबळे,साहाय्यक आयुक्त,ग प्रभाग.