डोंबिवली- पोलादाच्या मळीपासून उत्तम टिकाऊ, टणक रस्ते बांधले जाऊ शकतात. आस्ट्रेलिया, न्यूझिलंडमध्ये अशा पध्दतीने रस्ते तयार करण्यात आले आहेत. अलिबाग जवळील एका पोलाद उद्योगातून तयार होणाऱ्या मळीपासून अलिबाग परिसरातील रस्ते या मळीपासून बनविण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा नि्र्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ज्येष्ठ रस्ते बांधणी तज्ज्ञ डॉ. विजय जोशी यांनी रविवारी येथे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. जोशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने रस्ते बांधणीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल डॉ. जोशी यांना ‘ऑर्डर ऑफ आस्ट्रेलिया’ नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. डोंबिवलीतील ब्राह्मण सभेतर्फे डॉ. जोशी यांचे ‘विजयपथ एक संवाद’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, डॉ. विनय भोळे, सुचेता पिंगळे, श्रीकांत कानडे उपस्थित होते.

हेही वाचा >>> कंत्राटदारांच्या वादात कल्याण – नगर महामार्गाची सुरक्षा वाऱ्यावर

आस्ट्रेलियन सरकारने पोलाद उत्पादनातून निघणाऱ्या मळीपासून काही करता येईल का याचा विचार करण्यासाठी रस्ते बांधणी तज्ज्ञ डॉ. विजय जोशी यांची नेमणूक केली होती. संशोधनाअंती जोशी यांना मळीपासून टिकाऊ रस्ते बांधले जाऊ शकतात हे समजले. मळीमध्ये (स्लग) सीएओ नावाचा घटक असतो. त्यात पाणी अन्य आवश्यक घटक टाकले की मळीचे चांगले काँक्रीट तयार होते. सिमेंटपेक्षा ते टिकाऊ असते, असा अनुभव जोशी यांना आला. याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी सिडनीचा विमानतळ, धावपट्टी, शेकडो किमी लांबीचा महामार्ग मळीच्या काँक्रीटीकरणापासून बांधण्यात आला आहे. आस्ट्रेलिया, कोरिया अशाच पध्दतीने रस्ते तयार करण्यात आले असून त्यांची कालमर्यादा ३० वर्षापर्यंत असे जोशी म्हणाले.

भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे माहिती असुनही रस्त्यांच्या दुतर्फा गटारे, सेवावाहिन्यांसाठी स्वतंत्र भुयारी मार्गिका केली जात नाही. पावसाचे हे पाणी रस्त्यावरुन वाहते. सतत पाण्याच्या संपर्कात आल्याने रस्त्याची डांबर कमकुवत बनते. वाहन वर्दळीमुळे रस्ते खराब होतात, असे जोशी यांनी सांगितले. रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी या सुविधां बरोबर जल, महवाहिन्या रस्त्याखाली खोलवर टाकणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> विकास कामांचे लोकार्पणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी कल्याणमध्ये

राज्यात रस्ते बांधणी करताना अभियंते रस्ता टिकाऊ होईल यापेक्षा त्या रस्त्याच्या देयकाकडे अधिक लक्ष देतात. तो रस्ता कोणाच्या निधीतून बांधला जातोय याची काळजी घेतली जाते. या सगळ्या गडबडीत रस्त्याच्या दर्जाकडे कोणाचे लक्ष राहत नाही. कनिष्ठ अभियंता या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार आहे. त्याने रस्ते काम सुरू असताना तेथे प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे, तसे होत नाही, अशी खंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. रस्ते कामांच्या ठिकाणी कोणाच्या निधीतून काम होतय यापेक्षा हे रस्ते काम कोणत्या अभियंत्याच्या नेतृत्वाखाली होत आहे याचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्यात यावा. जेणेकरुन त्या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी त्या अभियंत्यावर येईल. आणि तो रस्ता खराब झाला तर त्याची जबाबदारी त्या अभियंत्यावर निश्चित होईल. लोक त्याला जाब विचारतील. या भीतीपोटी तो रस्ता सुस्थितीत होईल, अशी सूचना डॉ. कोल्हटकर यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steel slag road in alibaug area says senior road construction expert dr vijay joshi zws