कल्याण : प्रशासकीय संवर्गातील कर्मचाऱ्याला सेवाज्येष्ठते प्रमाणे सहाय्यक आयुक्त पद देणे पालिका सेवा ज्येष्ठता नियमावली आणि आकृती बंधाप्रमाणे बंधनकारक आहे. परंतु, पालिका आयुक्तांच्या आग्रहावरुन आयुक्त कार्यालयातील तांत्रिक सेवेतील एका लघुलेखकाला (स्टेनोग्राफर) साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार पदोन्नतीने देण्यात आल्याने या पदासाठी पात्र अनेक सेवाज्येष्ठ अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेतील सेवाज्येष्ठता यादी आणि आकृतीबंधा नुसार पदोन्नत्ती देणे हे सामान्य प्रशासन विभागाचे काम आहे. आयुक्तांनी कितीही आग्रह केला तरी आयुक्तांची चूक दुरुस्त करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे सामान्य प्रशासन विभागाचे काम आहे. आताच्या सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे या सरसकट कोणतीही सेवानियमावली न तपासता आयुक्तांचा आग्रह म्हणून तांत्रिक पदोन्नतीचा संमती देत असल्याने महापालिका कर्मचारी सेनेने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. लवकरच या संघटनेचे पदाधिकारी उपायुक्त दिवे यांची भेट घेऊन चुकीचे पायंडे प्रशासनात पाडू नका अशी मागणी करणार आहेत.
पालिका आयुक्त कार्यालयात उत्तम रावते हे उच्चश्रेणी लघुलेखक (स्टेनोग्राफर-मराठी) काम करतात. आपली आणि साहाय्यक आयुक्तांची वेतनश्रेणी एकच आहे. आपण साहाय्यक आयुक्त पदासाठी पात्र आहोत, असे लघुलेखक रावते यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना सांगितले. आयुक्तांनी तात्काळ सामान्य प्रशासन विभागाला रावते यांना साहाय्यक आयुक्त पद देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी रावते हे तांत्रिक संवर्गातील लघुलेखक आहेत. ते प्रशासकीय सेवेतील कर्मचारी नाहीत असे सांगून अशाप्रकारे पदोन्नती देणे चुकीचे ठरेल असे आयुक्तांना सांगणे आवश्यक होते. उपायुक्त दिवे यांनी आयुक्तांची नाराजी नको म्हणून रावते यांच्या पदोन्नत्तीचा प्रस्ताव तयार करुन तो आयुक्तांना पाठविला, असे पात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात रावते प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त पदी दिसले तरी आश्चर्य नको, अशी टीपणी कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा : अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि…
तीन वर्षाच्या काळासाठी आयुक्त, उपायुक्त पालिकेत शासन सेवेतून येतात. संगनमताने चुकीचे निर्णय घेऊन प्रशासनात चुकीचे पायंडे पाडतात. उद्यान अधीक्षक जाधव यांना प्रशासनाने सचिव पद देऊन पात्र उमेदवाराला वेळोवेळी डावलले आहे. प्रभागांमध्ये साहाय्यक आयुक्त नेमणुका करताना काही अधीक्षकांना डावलून वरिष्ठ लिपिकांना पदोन्नती देण्यात आली आहे, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे यांना संपर्क साधला. त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. बातमीला प्रतिक्रियेसाठी उपायुक्त दिवे यांना संपर्क केला की अलीकडे त्या प्रतिसाद देत नाहीत.
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीला संघटनेचा विरोध नाही. नियुक्ती देताना कोणा पात्र कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. लघुलेखक उत्तम रावते हे तांत्रिक सेवेतील कर्मचारी असताना त्यांना आकृती बंधातील तरतुदींचे उल्लंघन करुन कशी पदोन्नती दिली याचा जाब सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे यांना विचारण्यात येईल. – सचीन बासरे , उपाध्यक्ष म्युनसिपल कर्मचारी सेना, कल्याण डोंबिवली पालिका
अशी काही पदोन्नती दिली आहे याची आपणास माहिती नाही. असा कोणताही प्रस्ताव आपल्या समोर आलेला नाही. – मंगेश चितळे ,अतिरिक्त आयुक्त