नोटाबंदीनंतरच्या चार महिन्यांतच ‘कार्ड पेमेंट’ला खो; सध्या अवघे ८ ते १० टक्के व्यवहार ‘कॅशलेस’

नोटाबंदीनंतर केंद्र आणि राज्य सरकारने ‘रोकडमुक्त’ व्यवहारांना चालना देण्यासाठी देशातील पहिले ‘रोकडमुक्त गाव’ म्हणून जाहीर करण्यात आलेल्या मुरबाडजवळील धसई गावातच आज ‘रोकडमुक्ती’ची संकल्पना अडगळीत पडल्याचे चित्र आहे. गावातील ७० दुकानांमध्ये ‘कार्ड पेमेंट’ यंत्रांचे वाटप करून सुरू करण्यात आलेल्या रोकडमुक्तीमधील तांत्रिक तसेच व्यवहारिक अडचणींसोबतच बँकांमधील बेबनावामुळे धसईत आजही रोकडमुक्ती हे एक मृगजळ ठरले आहे. नव्या आणि जुन्या बँकांच्या वादामुळे येथील ग्रामस्थांना पुन्हा व्यवहारांसाठी खिशातील रोख रकमेलाच हात घालावा लागत असल्याचे दिसून येते.

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि बॅँक ऑफ बडोदाच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील धसई गाव १ डिसेंबर २०१६ रोजी रोकडमुक्त जाहीर करण्यात आले होते. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: या गावात जाऊन स्वप्निल पातकर या किराणा दुकानातून वस्तू विकत घेत कार्डद्वारे पैसे अदा करून व्यवहार केला होता. त्यावेळी गावात जवळपास ७० व्यापारी आणि दुकानदारांना ‘स्वाईप मशीन’ देण्यात आले होते.  सुरुवातीचे काही दिवस धसई आणि आसपासच्या अनेक ग्राहकांनी कार्डचा वापर केला. मात्र तीन ते चार महिन्यातच व्यवहारासाठी कार्डचा वापर होईनासा झाला.

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असताना धसई गावाच्या व्यवहारांचा आढावा घेतला असता, सध्याच्या घडीला अवघे आठ ते दहा टक्के व्यवहार रोकडमुक्त होत असल्याचे येथील व्यापारी सांगतात. त्यासाठी येथील जुन्या बँका कारणीभूत असल्याचा दावाही येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. रोकडमुक्त गाव जाहीर करत असताना ज्या दुकानात पहिला व्यवहार झाला, त्या दुकानाचे मालक स्वप्निल पातकर यांना विचारले असता, येथील जुन्या बँकांत सर्वाधिकखातेदार आहेत. मात्र मागणी असूनही त्यांनी आपल्या खातेदारांना जाणीवपूर्वक कार्डे दिलेली नाहीत. त्यामुळे रोकडमुक्त व्यवहार वाढू शकले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. गावात नव्याने आलेल्या बँकेला रोकडमुक्तीचा मान मिळाल्यानेच जुन्या बँका प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही व्यापारी करत आहेत. येथील कपडय़ाचे दुकान असलेल्या सुभाष निचिते यांना विचारले असता, मोठी खरेदी करण्यासाठी आलेले (पान ३वर)

जुन्या बँकांमध्ये जवळपास २७ हजार खातेधारक आहेत. बँकांच्या काही नियमांमुळे अद्याप त्यांना एटीएम कार्ड मिळू शकलेले नाही. त्यात धसईत तीनच बँका असल्याने गर्दी वाढल्याने खातेधारक बँकेत जाणे टाळतात. त्यामुळे रोकडमुक्त व्यवहार अधिक वाढू शकले नाहीत. मात्र रोकडमुक्त व्यवहारांचा शून्यापासून सुरू झालेला हा आकडा वर्षभरात १५ ते २० टक्कय़ांपर्यंत पोहोचला आहे, हे समाधानकारक आहे. वारंवार खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळेही रोखमुक्त व्यवहारात अडथळे आले.

– रणजित सावरकर, स्वा. सावरकर प्रतिष्ठान, मुंबई</strong>

मागणी करणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ कार्ड दिले जाते. त्यामुळे कार्ड दिले जात नसल्याचा आरोप चुकीचा आहे. सध्या एटीएमचा वापरही वाढला असून त्याचा परिणाम आमच्या कामकाजावर दिसून येतो आहे.

–  नारायण कोळी, शाखा व्यवस्थापक, विजया बँक, धसई

गेल्या वर्षभरापासून ज्या खातेधारकांनी मागणी केली त्या सर्वाना एटीएम कार्ड देण्यात आले आहे. नव्या सर्वच खातेधारकांना एटीएम कार्ड दिले जाते. मात्र बहुतेक जुने ग्राहक अद्याप कार्ड घेण्यासाठी येत नसल्याने त्यांच्याकडे कार्ड नाही. 

अशोक वारघडे, शाखा व्यवस्थापक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅँक, धसई.