लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पूर्व भागातील डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील सागर्ली भागात दुधात पाणी मिसळून दुधाच्या पिशव्या विक्रीसाठी तयार करुन ठेवण्यात आलेल्या दुधाच्या पिशव्यांचा साठा रविवारी सकाळी पोलिसांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जप्त केला आहे. या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांचा गैरधंदा उघड झाला आहे.
डोंबिवलीतील सागर्ली भागात काही दूध विक्रेते पहाटेच्या वेळेत दुधात पाणी मिसळून त्याची पिशव्यांमधून विक्री करत होते. परिसरातील रहिवाशांना याची कुणकुण होती. विक्रेत्यांकडून त्रास होईल या भीतीने याविषयी उघडपणे कोणी बोलत नव्हते. काही स्थानिकांनी ही माहिती शिवसेनेचे कल्याण तालुकाप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश पाटील यांना दिली. पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते सागर्ली मधील ज्या इमारतीच्या गाळ्यामध्ये दूध विक्रेते भेसळीचा उद्योग करत होते. तेथील हालचालींवर पाळत ठेऊन होते. दूध विक्रेते दुधात पाणी मिसळून त्या पिशव्या डोंबिवली शहरात विकत असल्याची खात्री पटल्यावर रविवारी पहाटे माजी नगरसेवक महेश पाटील, स्थानिक पोलीस आणि कार्यकर्ते यांनी अचानक दूध विक्रेत्यांच्या गाळ्यावर छापा टाकला. यावेळी विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
हेही वाचा… डोंबिवलीत ऑनलाइन खेळातून नोकरदाराची फसवणूक
सुरुवातीला विक्रेत्यांनी आम्ही भेसळ न करता दुधाच्या पिशव्या विकत असल्याचा पवित्रा घेतला. परंतु येथे पाण्याची भांडी, तपेली तसेच पिशव्या पुन्हा सिलबंद करण्यासाठीचे यंत्र येथे कशासाठी ठेवले आहे, असे प्रश्न पोलीसांनी करताच, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अखेर त्यांनी दुधात पाणी भेसळ करत असल्याची कबुली पोलिसांना दिली.
हेही वाचा… ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी
‘प्रसिध्द दूध विक्रेत्या कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या खरेदी करायच्या. या पिशव्यांमधील अर्धे दूध काढून घ्यायचे आणि त्यात पाणी ओतून त्या पिशव्या पुन्हा बंदिस्त करुन विकण्याचा प्रकार हे दूध विक्रेते करत होते. घरोघर, किराणा दुकानांमध्ये ही भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात होती. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता,’ असे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यावर अशा प्रकरणाची आमच्याकडे नोंद करण्यात आलेली नाही. अशी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस करू शकतात, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.