कल्याण – ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागातील राज्य भरारी पथक क्रमांक दोनच्या भरारी पथकाने बुधवारी शहापूर तालुक्यातील नडगाव, कर्जत तालुक्यातील मौजै मोग्रज येथे छापे टाकून विदेशी मद्याचे कारखाने उद्ध्वस्त केले. दमण, गोवा येथून मद्याचा साठा आणून त्या मद्यामध्ये भेसळ करून या मद्याच्या बाटल्यांना विदेशी महागड्या मद्याच्या बाटल्यांची बुचे लावून हे मद्य महाराष्ट्राच्या विविध भागात विकले जात असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. भरारी पथकाने या बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्या श्रीकांत देविदास टर्ले, किशोर गजानन पाटील, प्रदीप तुकाराम बामणे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ लाख ८१ हजार रूपयांचा विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांना अंबरनाथ काटई रस्त्यावरील नेवाळी नाका भागातून एका मोटार जात आहे. या वाहनातून विदेशी मद्याचा बनावट साठा नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नेवाळी नाका येथे बुधवारी सापळा लावला होता. संध्याकाळच्या वेळेत पथक वाहनांची तपासणी करत असताना एका वॅगनाॅर वाहनाचा पथकाला संशय आला.

या वाहनाची तपासणी केल्यावर पथकाला त्यात बनावट विदेशी मद्याचे खोके आढळून आले. या वाहनातून पथकाने दोन जण ताब्यात घेतले. यामधील श्रीकांत देविदास टर्ले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहापूर तालुक्यातील नडगाव येथील पितांबरी नगरमधील पत्रा चाळीत पथकाने छापा टाकला. तेथे प्रदीप तुकाराम बामणे हे दमण निर्मित मद्यापासून बनविलेल्या मद्याच्या बाटल्यांना विदेशी मद्याची बुचे लावून, बनावट लेबल लावताना आढळून आला. तेथे विदेशी मद्याचा साठा पथकाला आढळला. पथकाने तेथील मद्य साठा जप्त करून बामणे यांना अटक केली. कारखाना उद्ध्वस्त केला.

प्रदीप बामणे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने कर्जत तालुक्यातील मोग्रज येथील सत्यवती प्रतिष्ठान गोशाळेच्या बाजुला असलेल्या एका पत्र्याच्या निवाऱ्यात छापा मारला. तेथे गोवा राज्यातील निर्मित फेणी, इतर मद्यसाठा आढळून आला. भरारी पथकाने तिन्ही ठिकाणाहून एकूण बनावट विदेशी मद्याचे एकूण १२६ खोके जप्त केले.पथकाने १८ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाण, आर. व्ही. सानप, जवान के. एस. वझे, एस. बी. धुमाळ, आर. एम. राठोड, व्ही. एस. कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader