डोंबिवली – येथील पूर्व भागातील राजाजी रस्त्यावरील म्हात्रेनगर भागातील एका इमारतीच्या सदनिकेमधून रामनगर पोलिसांनी कारवाई करून एक लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखुजन्य, गुटखा पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी दोन जणांवर प्रतिबंधित वस्तूंची साठवण, विक्री आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका होईल हे माहिती असूनही या वस्तूंची हाताळणी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मंगळवारी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र सोनवणे यांनी राम केवल गुप्ता, राकेश गुप्ता, शिवकुमार उर्फ शिवा आणि आतिक (पूर्ण नाव नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना गुप्त माहिती मिळाली की राजाजी रस्त्यावरील म्हात्रेनगर भागात एका विक्रेत्याने प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांची साठवण करून ते पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत.
उपायुक्त अतुल झेंडे यांना ही माहिती रामनगर पोलिसांनी दिली. त्यांनी तातडीने संबंधितांवर छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. साहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे, उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस पथकासह म्हात्रेनगर भागात मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले. जीवन छाया इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर राम गुप्ता यांच्या हातामधील पिशवीत पोलिसांना विमल गुटख्याची पाकिटे आढळून आली. अधिक चौकशीत त्यांनी काही साठा बंद सदनिकेत असल्याचे सांगितले. पोलीस, पंचांसमक्ष सदनिका उघडताच एका मोकळ्या जागेत डायरेक्टर पान मसाला, व्हाॅटशाॅट, विमल पान, नजरपान, राजनिवास, राजश्री, केसर युक्त विमल, कॅया गोल्ड विमल, राजनिवास ग्रीन अशा प्रतिबंधित तंबाखूजन्य पाकिटांचा गोण्यांमध्ये साठा आढळून आला. या साठ्याची एकूण किंमत एक लाख ६४ हजार होती.

हेही वाचा – मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

हेही वाचा – ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी

हा माल स्वतासह राकेश गुप्ता आणि शिव कुमार यांनी विक्रीसाठी आणून ठेवला आहे, अशी कबुली राम गुप्ता यांनी पोलिसांना दिली. हे प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ मुंबईतील सॅन्डहर्स्ट रोड येथील एका विक्रेत्याकडून खरेदी केले आहेत, असेही गुप्ता यांनी सांगितले. राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तुंचा साठा, विक्री करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यावर गुन्हे दाखल केले. कल्याण, डोबिवली शहरांमधील अनेक पानटपऱ्यांवर प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या कारवाईत हवालदार नीलेश पाटील, रोहिदास पाटील, बंडु शेळके, तुळशीराम लोखंडे, नितीन सांगळे सहभागी झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock of prohibited tobacco products seized in mhatrenagar in dombivli ssb